Home Breaking News स्वरांच्या दुनियेतील एक युग संपले; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने चाहत्यांना...

स्वरांच्या दुनियेतील एक युग संपले; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का.

32
0

स्वरांच्या दुनियेतील एक युग संपले; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का.

Mumbai:प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी (31 मे 2026) वयाच्या 89 व्या वर्षी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी संगीतविश्वावर शोककळा पसरली असून, एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सुमन कल्याणपूर या आपल्या मधुर, कोमल आणि सुरेल आवाजासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या आवाजाची तुलना अनेकदा लता मंगेशकर  यांच्या आवाजाशी केली जात असे. मात्र, दिग्गज गायिकांच्या काळातही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि भावगीत, भक्तिगीत, गझल तसेच चित्रपटगीतांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे जन्मलेल्या सुमनताईंचे मूळ नाव सुमन हेमाडी होते. 1943 मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या सुमनताईंनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आणि पुढे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 1954 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

मराठीतील ‘केशवा माधवा’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ यांसारखी भावगीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. हिंदीमध्ये ‘ना तुम हमें जानो’, ‘मेरा प्यार भी तू है’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ आणि ‘मेरे मेहबूब ना जा’ यांसारख्या गाण्यांनी त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. 

सुमन कल्याणपूर यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, भोजपुरी, ओडिया आणि इतर अनेक भाषांमध्ये गायन केले. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केले. त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना 2023 मध्ये Padma Bhushan पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, मोहम्मद रफी पुरस्कार आणि इतर अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. 

सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाने एक अविस्मरणीय आणि अजरामर स्वर गमावला आहे. त्यांच्या गाण्यांचा सुवास आणि स्वरांचे तेज पुढील अनेक पिढ्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे.