Home Breaking News पुणे पोलिस दलात खळबळ; दोन महिन्यांत तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे पोलिस दलात खळबळ; दोन महिन्यांत तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

41
0
पुणे पोलिस दलात खळबळ; दोन महिन्यांत तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.

पुणे: ४ मे २०२६ पुणे शहरातील पोलिस दलाच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या सलग लाचखोरीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून ओळख असलेल्या पोलिसांमध्येच भ्रष्टाचाराची पाळेमुळे घट्ट रुजल्याचे चित्र समोर येत आहे.या सर्व प्रकरणांचा भंडाफोड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्या कारवायांतून झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांत तीन पोलिस अधिकारी लाचखोरीत अडकले असून, त्यामध्ये एका महिला सहायक पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून ओळख असलेल्या पोलिस दलावरच आता भ्रष्टाचाराचे सावट आले आहे.

लोहगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुटे याला अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे, ही लाच त्याने थेट पोलिस ठाण्यातच घेतल्याने खळबळ उडाली.

या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने जेरबंद केले. त्यांनी यापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीची फिर्याद नोंदवली होती, मात्र त्याच प्रकरणात आरोपीकडून मोठी रक्कम उकळल्याचे उघड झाले. एसीबीचे पथक थेट पोलिस आयुक्तालयात पोहोचल्याने या प्रकरणाची तीव्रता अधोरेखित झाली आहे.

पोलिस ठाण्यांमधील कार्यपद्धतीबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तक्रारी ‘मर्जीतील’ अधिकाऱ्यांकडे देऊन त्यानुसार तक्रारदार किंवा आरोपी यांच्याकडून लाचेची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

घटना क्रमांक १:

बंडगार्डन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर याच्यावर मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी करून नंतर एक लाख रुपयांवर तडजोड केल्याचे उघड झाले.

घटना क्रमांक २:

आर्थिक गुन्हे शाखेतील एपीआय वैशाली तोटेवार यांना २८ लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. बदलीनंतरही त्यांनी प्रलंबित प्रकरणात हस्तक्षेप करून लाच घेतल्याचे समोर आले.

घटना क्रमांक ३:

लोहगाव पोलिस ठाण्यातील पीएसआय मनोज बरुटे याने एनसी प्रकरणात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेतली. एसीबीने त्याला रंगेहाथ अटक केली.

एकीकडे गुन्हेगारीवर नियंत्रण असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे पोलिस दलातीलच काही अधिकारी नागरिकांकडून ‘तोडपाणी’ करत असल्याचे वास्तव उघड होत आहे. त्यामुळे पोलिस दलातील पारदर्शकता, शिस्त आणि विश्वासार्हतेवर पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.