यवत परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४१ किलो गांजा जप्त, २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; स्विफ्ट कारसह दोघांना अटक
पुणे : ४ ऑक्टोबर २०२६.
नशामुक्त भारत अभियान आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. यवत परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून ४१ किलो वजनाचा गांजा तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी स्विफ्ट कार, असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे.
४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत परिसरात गस्त घालत असताना अमली पदार्थांची बेकायदेशीर देवाणघेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहितीची खातरजमा केली.
पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन अशोक बरडे (वय २९, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, पुणे; मूळ रा. रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि कुशाल दत्तात्रय बिनवडे (वय ३०, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, पुणे; मूळ रा. वंजारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे गांजा घेऊन स्विफ्ट कारमधून जात असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह छापा कारवाई केली. यावेळी दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ४१ किलो गांजा आणि स्विफ्ट कार क्रमांक MH 12 WX 6505 असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०११/२०२६ अन्वये NDPS कायदा कलम ८(क), २०(ब)(ii) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी नागरिक आणि पालकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून युवा पिढीला वाचवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक करणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईत पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक गणेश विरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब धडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पुणे ग्रामीण पोलिसांची ही कारवाई अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधातील मोहिमेला आणखी बळ देणारी ठरली आहे.