Home Breaking News मंचर एसटी बसस्थानकात सोन्याची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अटक; ४.९० लाखांचे दागिने...

मंचर एसटी बसस्थानकात सोन्याची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अटक; ४.९० लाखांचे दागिने जप्त

38
0

मंचर एसटी बसस्थानकात सोन्याची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अटक; ४.९० लाखांचे दागिने जप्त

मंचर :३० सप्टेंबर २०२६

एसटी बस आणि बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि मंचर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अशोक बबन भोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड; सध्या रा. हिवरगाव फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), सौ. अश्विनी अविनाश भोसले (रा. माहिजाळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि सतीश मधुकर गोरे (रा. शिवाजीनगर जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

मंचर एसटी बसस्थानक तसेच बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर संयुक्त पथकाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपींकडून मंचर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १४१/२०२६ आणि १२०/२०२६, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ९० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

एसटी बसमध्ये किंवा बसस्थानकावर प्रवास करताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.