पुण्यात आंतरराज्यीय महिला चोरट्यांची टोळी गजाआड! ६ महिलांना अटक. ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | ४ सप्टेंबर २०२६ :
लक्ष्मीनगर पोलिसांनी महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय महिला टोळीचा पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशातील ६ महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड आणि १० मोबाईल असा सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी महिला गर्दीच्या बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना लक्ष्य करत असल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे निशा शंतनू सिसोदिया, प्रिया उर्फ वाईफ आसिक सिसोदिया, पूनम प्रदीप सिसोदिया, वर्षा कमल सिसोदिया, आसना रघुवीर सिसोदिया आणि सोनिका निरोत्तम सिसोदिया अशी आहेत. पोलिसांकडून आणखी दोन संशयितांचा शोध सुरू आहे.
२७ ऑगस्ट रोजी या महिला पुण्यातून मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ येथे कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपासात लक्ष्मीनगरसह विश्रांतबाग, विश्रांतवाडी आणि लष्कर परिसरातील एकूण ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.


