Home Breaking News पुणे ग्रामीणमध्ये पोलिसांची कारवाई; खुनाचा प्रयत्न, मारहाण, चोरी अन् शस्त्र प्रकरणे समोर,८...

पुणे ग्रामीणमध्ये पोलिसांची कारवाई; खुनाचा प्रयत्न, मारहाण, चोरी अन् शस्त्र प्रकरणे समोर,८ गुन्ह्यांची नोंद.

38
0

पुणे ग्रामीणमध्ये पोलिसांची कारवाई; खुनाचा प्रयत्न, मारहाण, चोरी अन् शस्त्र प्रकरणे समोर,८गुन्ह्यांची नोंद.

पुणे ग्रामीण :१७ : सप्टेंबर 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत १५ व १६ सप्टेंबर २०२६ रोजी विविध ठिकाणी घडलेल्या घटनांप्रकरणी खुनाचा प्रयत्न, चोरी, दुखापत, शस्त्र बाळगणे तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन अशा स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे. 
 सुपा : आईचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न
पोलीस ठाणे : सुपा
घटना : १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता
गुन्हा दाखल : १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३९ वाजता
ठिकाण : मौजे सुपा, खोपवाडी, ता. बारामती, जि. पुणे
फिर्यादी बाळुबाई जालिंदर चांदगुडे (वय ६१, व्यवसाय शेती) या सुपा येथील खोपवाडी परिसरात राहतात. त्यांच्या घरासमोरील अंगणात वाळत घातलेल्या चवळीच्या शेंगांचे घमेले घेऊन त्या घरात जात असताना त्यांचा मोठा मुलगा सागर जालिंदर चांदगुडे (वय ४२) तेथे आला.
जमीन व घराची वाटणी का देत नाही, असे म्हणत आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर हातात आणलेल्या नायलॉनच्या दोरीने फिर्यादीचा गळा जोरात आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी खाली पडल्याने त्यांच्या दोन्ही हातांच्या कोपऱ्यांना व दोन्ही पायांच्या गुडघ्यांना खरचटले. आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गुन्ह्याचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ताकवणे करीत आहेत. 
लोणावळा : ITMS कमांड सेंटरमधून जनरेटर बॅटरी व केबल चोरी
पोलीस ठाणे : लोणावळा शहर
घटना : १२ सप्टेंबर रात्री ११ ते १३ सप्टेंबर पहाटे १२.४५ दरम्यान
ठिकाण : एक्सप्रेस हायवे, कुसगाव टोलनाका येथील ITMS कमांड अँड कंट्रोल सेंटर कंपनी, मावळ
फिर्यादी सागर शाम घुमकर (वय ४०, व्यवसाय नोकरी) यांच्या फिर्यादीनुसार तीन अज्ञात व्यक्तींनी कंपनीच्या कंपाउंडमध्ये प्रवेश केला. जनरेटरमध्ये ठेवलेल्या बॅटऱ्या तसेच स्टोअर रूममधील अर्थिंग केबल वायर, केंट सिक्स केबल व पॉवर केबल चोरी करून नेल्याचे समोर आले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये दोन जनरेटरच्या बॅटऱ्या अंदाजे ₹१० हजार, २०० मीटर अर्थिंग केबल ₹७ हजार, ३०० मीटर केंट सिक्स केबल ₹६ हजार आणि ५०० मीटर पॉवर केबल ₹१५ हजार, असा एकूण ₹३८ हजारांचा मुद्देमाल आहे. तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. 
यवत : मोटारसायकल पार्किंगच्या वादातून दगड-विटांनी मारहाण
पोलीस ठाणे : यवत
फिर्यादी : माया सुरेश अडागळे, वय ३५, गृहिणी
ठिकाण : मौजे देलवडी, ता. दौंड, जि. पुणे
फिर्यादीच्या घराच्या दारासमोर आरोपीने मोटारसायकल पार्क केली होती. त्यानंतर फिर्यादीने डायल ११२ वर फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचून फिर्यादी व आरोपींना समजावून सांगत असताना संतोष चांगदेव अडागळे याने हातात दगड घेतला, तर रेखा संतोष अडागळे हिने हातात वीट घेऊन फिर्यादीच्या दिशेने फेकून मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकारात फिर्यादीला किरकोळ दुखापत झाली. घटना १५ सप्टेंबरच्या रात्री घडली असून १६ सप्टेंबर रोजी पहाटे ३.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. 
 जेजुरी : कौटुंबिक वादातून महिलेवर लोखंडी गजाने व लाथाबुक्क्यांनी हल्ला
पोलीस ठाणे : जेजुरी
फिर्यादी : ताराबाई हरिश्चंद्र भोसले, वय ६०, मजुरी
ठिकाण : पिंपरे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे
ताराबाई भोसले यांच्या फिर्यादीनुसार, त्या घरी झोपेत असताना त्यांच्या मुलगा अतुल हरिश्चंद्र भोसले, मोठा मुलगा अमोल हरिश्चंद्र भोसले आणि मुलगी दुर्गा हरिश्चंद्र भोसले यांच्याशी संबंधित कौटुंबिक वादातून त्यांच्या सुनेच्या माहेरकडील आरोपी क्रमांक १ ते ५ यांनी घरात येऊन मारहाण केली.
आरोपींनी लोखंडी गज, हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर तसेच किरकोळ दुखापत केल्याचा आरोप आहे. याशिवाय होंडा शाईन आणि स्प्लेंडर प्रो मोटारसायकलींवर दगड मारून नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. 
मोरगाव : ड्रायक्लीनिंग दुकानात पेमेंटच्या वादातून तोडफोड व मारहाण .पोलीस ठाणे : सुपा
फिर्यादी : सुयेश अशोक कापरे, वय २७
ठिकाण : मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे
फिर्यादी ड्रायक्लीनिंगच्या दुकानात असताना सुरज उर्फ पप्पु चाचर आणि त्याचा एक अनोळखी मित्र दुकानात आले. दुकानात केलेल्या कामाचे पेमेंट मागितल्यानंतर पेमेंट संध्याकाळी देतो, आधी चप्पल दुकानाबाहेर काढा, असे सांगितल्याचा राग आरोपीला आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने हातातील लोखंडी स्क्रू ड्रायव्हरने दुकानातील लाईट बोर्ड, इस्त्री, टेबल, मोबाईल व तीन खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. आरोपीच्या अनोळखी साथीदाराने फिर्यादीला पकडून ठेवले असताना सुरज उर्फ पप्पु चाचर याने स्क्रू ड्रायव्हरने फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजूस व डाव्या हाताला मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.  
रांजणगाव : वेस्टेज जेवण घेण्याच्या वादातून दोघांकडून मारहाण
फिर्यादी : संतोष पोपट जाधव, वय ४५
आरोपी : अनिल मोतीराम शिंदे व सुनील मोतीराम शिंदे
ठिकाण : रांजणगाव MIDC परिसर, ता. शिरूर, जि. पुणे
फिर्यादी संतोष पोपट जाधव हे शेअरिंग फूड कॅन्टीनमधील वेस्टेज जेवण ठेवलेल्या ड्रममधून जेवण घेत असताना आरोपींनी त्यांना तसे करू नका, असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने आरोपींनी दगड व काहीतरी टणक वस्तूने फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस व कपाळावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या मारहाणीत फिर्यादीला दुखापत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार मुंडे करीत आहेत. 
सासवड : ७ लाखांचे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई पोलीस ठाणे : सासवड
फिर्यादी : तुषार बाळू लोंढे, पोलीस कर्मचारी
आरोपी : शुभम सतीश कामथे, वय २५, रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे
ठिकाण : चंदनटेकडीजवळ, के.के. पेढा दुकानाच्या पाठीमागे, सासवड
१६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.२० वाजता आरोपी शुभम सतीश कामथे हा गावठी पिस्तूल घेऊन वाहनामध्ये बाळगताना आढळून आला. त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून ₹३५ हजार किमतीचे स्टीलच्या लोखंडी बॉडीचे गावठी पिस्तूल जप्त केले. पिस्तुलाच्या बॅरलची लांबी १५.५ सेंटीमीटर व व्यास ८ मिमी असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. तसेच ₹७ लाख किमतीची काळ्या रंगाची मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कार जप्त करण्यात आली. वाहनाचा RTO क्रमांक MH 12 ZW 4762 असा नमूद आहे. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ₹७ लाख ३५ हजार आहे.  
वालचंदनगर : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; मोटारसायकलींवर शक्तिप्रदर्शन
पोलीस ठाणे : वालचंदनगर
फिर्यादी : गणेश संजय वानकर, पोलीस अंमलदार, वालचंदनगर पोलीस ठाणे
आरोपी : दीपक शिवाजी यादव, रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे व इतर १० ते १५ जण
ठिकाण : कॅनरा बँकेजवळ, वालचंदनगर, ता. इंदापूर
१२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता आरोपी दीपक शिवाजी यादव व इतर १० ते १५ जण मोटारसायकलींवर बसून एकत्र आले. त्यांनी शक्तिप्रदर्शन करत मोठमोठ्याने वाहनांचे आवाज करत दोनचाकी मोटारसायकली वेगाने चालवल्या.
या प्रकारामुळे रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी कृती केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.