Home Breaking News पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी मोठे वाहतूक बदल; ६० रस्त्यांवर निर्बंध, अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी मोठे वाहतूक बदल; ६० रस्त्यांवर निर्बंध, अवजड वाहनांना प्रवेशबंदी

44
0

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी मोठे वाहतूक बदल; ६० रस्त्यांवर निर्बंध, अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पिंपरी :१७ सप्टेंबर 

गणेशोत्सवातील  गर्दी  व विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आणि गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व्यापक वाहतूक बदल लागू केले आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यान्वये तात्पुरते निर्बंध जारी केले आहेत. प्रमुख अंतर्गत रस्ते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

१४, १९, २०, २४ आणि २५ सप्टेंबर २०२६ या दिवशी संबंधित मार्गांवर जड-अवजड वाहनांना २४ तास प्रवेशबंदी राहणार आहे. गणेशोत्सवाच्या इतर दिवसांमध्ये दररोज सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांवर निर्बंध लागू राहतील.

६० महत्त्वाच्या रस्त्यांवर निर्बंध

भोसरी, निगडी, पिंपरी, बावधन, वाकड, सांगवी, हिंजवडी आयटी पार्क, देहूरोड, चिखली आणि दिघी-आळंदी या वाहतूक विभागांतील सुमारे ६० महत्त्वाच्या रस्त्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पिंपरी मुख्य बाजारपेठ, मोरया गोसावी परिसर, थेरगाव घाट, डांगे चौक-वाकड, काळेवाडी-रहाटणी, हिंजवडी आयटी पार्क आणि आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

भोसरी-चिखली भागात बदल

१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान ठरावीक वेळेत भोसरी ब्रीजखाली पीएमपीएमएल बसच्या वाहतुकीवर निर्बंध राहतील. बसेसना पांजरपोळ किंवा मॅग्झीन चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. खडकीकडून हॅरिस ब्रीजमार्गे फुगेवाडीकडे जाणारी वाहतूक ग्रेड सेपरेटरमार्गे केली जाईल. चिखली भागातील आळंदी रस्त्यावरील वाहतूक भारतमाता चौकाकडे वळवण्यात आली आहे.

तळेगाव विभागात अवजड वाहनांना बंदी

२० सप्टेंबर रोजी तळेगाव ते एच.पी. चौकदरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. ही वाहतूक वडगाव फाटा, नवलाख उंब्रे आणि चाकण मार्गे वळवण्यात येईल. मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक आणि डोळसनाथ मंदिर परिसरातील काही मार्गही बंद राहतील.

सांगवी-वाकडमध्ये पर्यायी मार्ग

२० सप्टेंबर रोजी सांगवीतील माहेश्वरी चौक, जुनी सांगवी रस्ता, क्रांती चौक आणि फेमस चौकदरम्यान खासगी वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध राहतील. औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी काटेपुरम व मयूरनगरी मार्गाचा वापर करावा. वाकडमध्ये २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान दत्त मंदिर रस्त्यावरील वाहतूक कावेरीनगर आणि कस्पटे कॉर्नरकडे वळवण्यात येणार आहे.

निगडी-चिंचवडमध्ये मार्ग बंद

२५ सप्टेंबर रोजी अहिंसा चौक ते चाफेकर चौक, दळवीनगर ब्रीज तसेच भोई आळीहून चाफेकर चौकाकडे येणारे काही मार्ग बंद राहतील. वाहनचालकांनी लिंकरोड, बिजलीनगर आणि खंडोबा माळ मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्येही वाहतूक बदल

२० ते २५ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत हिंजवडी फेज-३, टाटा टी जंक्शन, मेझा-९ आणि शिवाजी चौक परिसरातील वाहतूक लक्ष्मी चौक व कस्तुरी चौक मार्गे वळवण्यात आली आहे.

पिंपरीतील प्रमुख मार्ग बंद

मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पिंपरीतील काळेवाडी पूल, डीलक्स चौक, कराची चौक आणि शगुन चौक परिसरातील मार्ग बंद राहणार आहेत. पर्यायी वाहतूक भाटनगर आणि स्मशानभूमी चौक मार्गे सुरू ठेवण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सूट

रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्या⁸त आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी केले आहे.