Home Breaking News MPSC मध्ये राज्यात प्रथम आलेल्या बीडच्या वन अधिकाऱ्याला 45 लाखांच्या लाचप्रकरणी ACB...

MPSC मध्ये राज्यात प्रथम आलेल्या बीडच्या वन अधिकाऱ्याला 45 लाखांच्या लाचप्रकरणी ACB कडून रंगेहात अटक.

46
0

MPSC मध्ये राज्यात प्रथम आलेल्या बीडच्या वन अधिकाऱ्याला 45 लाखांच्या लाचप्रकरणी ACB कडून रंगेहात अटक.

बीड: ३१ जुलै:बीड जिल्ह्यातील विभागीय वन अधिकारी (DFO) श्रीनिवास लखमवाड यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे वन विभागासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून (RFO) 2025-26 मधील वृक्षलागवडीसाठी मिळालेल्या 3.75 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण, प्रलंबित वेतनवाढ मंजूर करणे आणि अन्य प्रशासकीय कामे करण्यासाठी 12 टक्के कमिशन म्हणजेच 45 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्याने लाच देण्यास नकार दिल्यानंतर त्यांची वेतनवाढ रोखणे, निलंबनाचा प्रस्ताव पाठवणे आणि चौकशीची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

त्यानंतर तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर ACB कडे तक्रार केली. पडताळणीनंतर ACB ने बीडमधील अधिकाऱ्याच्या भाड्याच्या घरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पैसे स्वीकारताना श्रीनिवास लखमवाड यांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान 45 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये खऱ्या नोटांचे, तर 40 लाख रुपये डमी नोटांचे असल्याचेही समोर आले.

ही कारवाई ACB चे उपअधीक्षक हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने केली असून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विशेष म्हणजे, श्रीनिवास लखमवाड हे मूळ नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी बी.टेक. शिक्षण पूर्ण केले आहे. 2016 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. प्रामाणिकपणाचे उदाहरण म्हणून ओळख निर्माण केलेल्या अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक झाल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.