Home Breaking News तिबेटमधील सागामध्ये अडकलेले महाराष्ट्रा तील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना.

तिबेटमधील सागामध्ये अडकलेले महाराष्ट्रा तील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना.

63
0

तिबेटमधील सागामध्ये अडकलेले महाराष्ट्रा तील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना.

मुंबई : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेले महाराष्ट्रातील ३७ भाविक तिबेटमधील सागा येथे अडकले होते. या भाविकांना काठमांडूला वेळेत पोहोचणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांनंतर सर्व ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण केल्यानंतर परतीच्या मार्गावर सागा येथे ते अडकले. दरम्यान, त्यांचे काठमांडूहून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने त्यांना वेळेत काठमांडू गाठणे महत्त्वाचे होते.

भाविक सागा येथे अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक मदत व सहकार्य मिळवले. त्यानंतर भाविकांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. अखेर आज सकाळी ६ वाजता सर्व भाविकांनी सागा येथून काठमांडूकडे प्रवास सुरू केला.

या संकटाच्या काळात तातडीने मदत मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार मानले. सर्व भाविकांचा काठमांडू प्रवास सुरक्षितपणे पूर्ण व्हावा आणि त्यांना नियोजित विमानाने महाराष्ट्रात परतता यावे, यासाठी प्रशासनाकडूनही आवश्यक समन्वय साधला जात आहे.