Home Breaking News शिक्रापूर पोलिसांची कारवाई; मोन्या डेडगे एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध.

शिक्रापूर पोलिसांची कारवाई; मोन्या डेडगे एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध.

54
0

शिक्रापूर पोलिसांची कारवाई; मोन्या डेडगे एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध.

शिक्रापूर :२३ ऑगस्ट ; शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सुरुज ऊर्फ मोन्या संजय डेडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व वाळू तस्कर यांच्याबाबतच्या प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

डेडगे याच्याविरुद्ध यापूर्वी घातक हत्यारांनी जबर दुखापत करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, खून व खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी तसेच चोरीच्या मालाची विक्री, घातक हत्यारांनी दुखापत करणे आणि घरात अतिक्रमण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव शिक्रापूर पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावाची पुढील कार्यवाही करण्यात आली. हा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांपासून डेडगे याला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने २० ऑगस्ट २०२६ रोजी स्थानबद्धतेचा आदेश पारित केला.

या आदेशानंतर शिक्रापूर पोलिसांनी विशेष पथके तयार करून शोध घेतला. अखेर २३ ऑगस्ट २०२६ रोजी डेडगे याला ताब्यात घेऊन अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.