हिंजवडी आयटी पार्कमध्ये भारत-अमेरिका सुरक्षा दलांची संयुक्त मॉक ड्रिल; सहा तास चाललेल्या सरावाने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ.

पुणे : ६ ऑगस्ट ; पुण्यातील हिंजवडी फेज-२ येथील इन्फोसिस कॅम्पसमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी बुधवारी उच्चस्तरीय संयुक्त सुरक्षा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली. या सरावात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), महाराष्ट्र फोर्स वन, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच अमेरिकन लष्करातील १७ कमांडो सहभागी झाले होते.
दुपारी ३ ते रात्री ९ या सहा तासांच्या कालावधीत झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये आयटी पार्कवर दहशतवादी हल्ला झाल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून सुरक्षा यंत्रणांच्या प्रतिसादाची चाचणी घेण्यात आली. संपूर्ण सराव अत्यंत गुप्ततेत पार पडल्याने सुरुवातीला अनेक कर्मचारी गोंधळले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या संयुक्त सरावात 26 स्पेशल कॉम्पोझिट ग्रुप, बॉम्बशोधक व नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि दहशतवादविरोधी पथकांनीही सहभाग घेतला. हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे, नागरिकांची सुरक्षित सुटका करणे आणि विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे हा या मॉक ड्रिलचा प्रमुख उद्देश होता.
सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले की, ही केवळ पूर्वनियोजित सुरक्षा कवायत होती. कोणताही प्रत्यक्ष धोका किंवा दहशतवादी हल्ला झालेला नव्हता. संयुक्त सरावातून भविष्यातील संभाव्य संकटांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्याची तयारी तपासण्यात आली.
