हिंजवडीतील एकतर्फी प्रेमातून तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळी कांचन पोलिसांच्या नाकाबंदीत गनिमी काव्याने जेरबंद.

हिंजवडी:६ ऑगस्ट ; आरोपी दिनेश महादेव झांबरे (वय २३ वर्ष, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर; सध्या रा. मारुंजी भुमकर चौक, हिंजवडी, पुणे). यांचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही BCA चे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. शिक्षण घेत असताना संबंधित तरुणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा राग आरोपीच्या मनात होता.
गुरुवारी आरोपी दिनेश झांबरे हा तरुण व तरुणी राहत असलेल्या ठिकाणी गेला. त्याने दोघांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.
गुन्ह्यानंतर आरोपी त्याच्या ताब्यातील इंडिका कार (क्र. MH-13-EK-5828) मधून पुणे-सोलापूर मार्गाने पंढरपूरच्या दिशेने वेगाने पळून जात होता.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तात्काळ उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पवार यांच्याशी संपर्क साधून संशयित वाहनाची माहिती दिली.
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यासमोर पोलीस पथकाने (स.पो.नि. पांडुरंग पवार व पथक) तातडीने नाकाबंदी लावली. भरधाव वेगाने येणारी संशयित इंडिका कार पोलिसांच्या पथकाने धाडसाने अडवून चालकास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी दिनेश झांबरे याने हिंजवडी येथील खून व प्राणघातक हल्ल्याची कबुली दिली.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, वरिष्ठ पो.नि. विजयकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि. पांडुरंग पवार, पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, सचिन जगताप, कमलेश ढोले, निलेश जाधव, सचिन मोरे, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, विकास लगस, पो.कॉ. ऋषिकेश रसकर, अभिजित मोरे व सुवर्णा गायकवाड यांनी केली.
आरोपीचा पाठलाग करणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने (स.पो.नि. दुर्गानाथ साळुंके, पो.उ.नि. अशोक दुधावणे, नरेश भालसाने, पो.हवा. प्रशांत गिलबिले, पो.कॉ. मीनानाथ पवार व ओमप्रकाश कावळे) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पोहोचून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.
