Home Breaking News पोलीस ठाण्यात लाचखोरीचा प्रकार! उपाधीक्षकांच्या नावाने मागितली २५ लाखांची लाच; कारनामा करणाऱ्या...

पोलीस ठाण्यात लाचखोरीचा प्रकार! उपाधीक्षकांच्या नावाने मागितली २५ लाखांची लाच; कारनामा करणाऱ्या हवालदारांवर गुन्हा दाखल.

28
0

 पोलीस ठाण्यात लाचखोरीचा प्रकार! उपाधीक्षकांच्या नावाने मागितली २५ लाखांची लाच; कारनामा करणाऱ्या हवालदारांवर गुन्हा दाखल.

अकलूज | दि. ३० ऑगस्ट २०२६

माळशिरस : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलिस ठाण्याशी संबंधित २५ लाख रुपयांची कथित लाच मागितल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत समोर आला आहे. या प्रकरणात दोन खासगी व्यक्तींना ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दोन पोलिस हवालदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या पुलाखाली, जानकर प्लॉटजवळ ही कारवाई केली.

दोन खासगी दलाल ताब्यात

या कारवाईत आबा सावळा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना ताब्यात घेण्यात आले.

दोन हवालदारांविरोधात गुन्हा

या प्रकरणात पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे (ब. नं. १६५९) आणि पोलिस हवालदार राहुल मारुती वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांची नेमणूक नातेपुते पोलिस ठाण्यात असून ते सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अकलूज येथे कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राहुल वाघ हे माळशिरस पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

२५ लाखांची मागणी केल्याचा आरोप

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदार अनिल शिंदे यांनी स्वतःसाठी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या नावाने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर अटकपूर्व जामीन मिळवून देणे आणि पीसीपीएनडीटी कायद्याचे कलम न लावण्यासाठी पैसे मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

५ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना पकड

२७ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी तसेच बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या नावाने ५ लाख रुपये आणि पोलिस हवालदार राहुल वाघ यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

त्यानुसार एसीबीने सापळा रचला आणि खासगी व्यक्ती वळकुंदे व माने यांना ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

दोन्ही हवालदार फरार; शोध सुरू

कारवाईनंतर संबंधित दोन्ही पोलिस हवालदार फरार असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.