Home Breaking News मोशी ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी ग्रामस्थांसह महापौर रवि लांडगे यांचा पाठपुरावा! 

मोशी ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी ग्रामस्थांसह महापौर रवि लांडगे यांचा पाठपुरावा! 

11
0

मोशी ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी ग्रामस्थांसह महापौर रवि लांडगे यांचा पाठपुरावा! 

महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत सविस्तर बैठक; दुर्घटनाग्रस्तांना न्याय, दोषींवर कठोर कारवाई आणि मोशीतील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन.

पिंपरी-चिंचवड दि. २० जुलै २०२६ : मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, परिसरातील सुरक्षिततेचे प्रश्न आणि ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने आज पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकाराने मोशी ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत पार पडली. 

बैठकीमध्ये मोशी ग्रामस्थांनी दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा मांडत, मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळणे, दोषींवर कठोर कारवाई, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री, कचरा डेपोमुळे होणारे आरोग्यविषयक व पर्यावरणीय दुष्परिणाम तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक प्रश्नांबाबत आपल्या भावना आणि मागण्या स्पष्टपणे मांडल्या. 

ग्रामस्थांनी प्रत्येक मागणीची सखोल मांडणी करत ही घटना केवळ एका दुर्घटनेपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षितता, पर्यावरण आणि प्रशासनावरील विश्वासाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद केले. मोशीकरांच्या न्याय्य मागण्यांवर कोणतीही तडजोड होणार नसून प्रशासनाने याकडे सर्वोच्च प्राधान्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

बैठकीत पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या— 

* दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, यंत्रणा व कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

* मृतांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत तातडीने वितरित करण्यात यावी. 

* जखमी नागरिकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिका व शासनामार्फत उचलण्यात यावा. 

* पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय/महापालिका सेवेत नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. 

* मोशी कचरा डेपो बाबत निर्णय घेऊन परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्यात यावा. 

* परिसरातील आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात. 

* ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व प्रलंबित नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावेत. 

बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश देण्याबरोबरच मोशी ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न टप्प्याटप्प्याने आणि प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात प्रशासन कोणतीही दिरंगाई करणार नसून आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही नियमांनुसार गतीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, 

“मोशीतील प्रत्येक नागरिकाची वेदना मी जवळून अनुभवली आहे. दुर्घटनेत जीव गमावलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि मोशीकरांचे प्रत्येक न्याय्य प्रश्न मार्गी लावणे, ही माझी नैतिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी आहे. मोशीकरांना दिलेले आश्वासन पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील. नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षितता यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही.” 

बैठकीत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे,  

प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसदस्या सारिका गायकवाड, सारिका बोऱ्हाडे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसदस्य धनंजय आल्हाट, मंदा आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते राजेश सस्ते, उदय गायकवाड, निलेश बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे तसेच मोशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मोशी ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली असून, महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी समन्वयाने तातडीने आवश्यक कार्यवाही करून प्रलंबित कामे आणि न्याय्य मागण्या शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला.