पुण्यातील तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन; २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

पुणे, दि. १८ : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करून भविष्यातील औद्योगिक, आयटी आणि नागरी विकासाला गती देण्यासाठी पुणे–शिरूर, तळेगाव–चाकण–शिक्रापूर आणि हडपसर–यवत या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवारी गणेश कला क्रीडा मंच येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पांमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, २०३० पर्यंत पुणे देशाचे प्रमुख ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर हे तीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांमधून शासनाला सुमारे ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तिन्ही उन्नत मार्गांवर मेट्रो मार्गिकेचीही तरतूद करण्यात आली असून त्यामुळे पुढील काळात मेट्रोचे काम कमी खर्चात आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करता येईल. तसेच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे रिंगरोड आणि प्रमुख औद्योगिक पट्ट्यांशी जलद जोडणी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी हे तीन उन्नत मार्ग ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून हे प्रकल्प उभारले जात असून, त्यातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होईल. राज्य शासनाने भूसंपादन, करसवलती आणि बांधकाम साहित्यावरील शुल्क माफ करून प्रकल्पांना मोठे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला आणि औद्योगिक विस्ताराला सक्षम पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. पुणे–शिरूर, तळेगाव–चाकण–शिक्रापूर आणि हडपसर–यवत हे तीन उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. चाकण औद्योगिक परिसर, आयटी पार्क, रिंगरोड आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाला उत्तम जोडणी मिळाल्याने उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल. शासन पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी मेट्रो, रिंगरोड, विमानतळ विस्तार आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही वेग देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.