बारामतीत सुनेत्रा पवारांची विक्रमी आघाडी; राहुरीत अक्षय कर्डिले पुढे – दोन्ही पोटनिवडणुकांचे चित्र स्पष्ट होतंय.

बारामती: ४ मे २०२६: महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून, दोन्ही ठिकाणी सुरुवातीपासूनच एकतर्फी निकालाचे संकेत दिसू लागले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या प्रमुख उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीअखेर त्यांना तब्बल 78 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाल्याचे दिसून आले आहे.
बारामतीतील मतमोजणी एमआयडीसी परिसरातील केंद्रात सुरू असून, सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी करण्यात आली. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच विरोधकांवर मोठी आघाडी घेतल्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत, “हा विजय दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित आहे,” असे भावनिक वक्तव्य केले.
दुसरीकडे, राहुरी मतदारसंघात भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी जोरदार आघाडी घेतली आहे.
पाचव्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना 21 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती, तर बाराव्या फेरीपर्यंत ही आघाडी 50 हजारांहून अधिक झाली आहे.त्यांच्याविरुद्ध गोविंद कोकाटे यांच्यासह इतर उमेदवार रिंगणात असले तरी, सध्याच्या कलानुसार राहुरीतही भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.
राजकीय चित्र स्पष्ट :बारामतीत सुनेत्रा पवार यांची मोठी आघाडी, राहुरीत अक्षय कर्डिले यांचा एकतर्फी विजयाचा मार्ग ,दोन्ही ठिकाणी सहानुभूतीची लाट निर्णायक ठरत असल्याचे संकेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या दोन्ही पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.