Home Breaking News पिंपरी-चिंचवडमध्ये कलम ३७ लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान जमावबंदी.

पिंपरी-चिंचवडमध्ये कलम ३७ लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान जमावबंदी.

59
0

पिंपरी-चिंचवडमध्ये कलम ३७ लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान जमावबंदी.

शस्त्रे, मिरवणुका आणि भडकावू घोषणांवर निर्बंध; आदेश उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पिंपरी चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१) व (३) लागू केले आहे. पोलीस सहआयुक्त डॉ .शशिकांत महावरकर यांनी हा आदेश जारी केला असून तो २७ मे २०२६ रोजी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. हा आदेश ९ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.

या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध प्रकारच्या कृत्यांवर निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जारी आदेशानुसार दाहक पदार्थ, स्फोटके तसेच शारीरिक इजा पोहोचवू शकणारी शस्त्रे किंवा साधने बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. तलवारी, भाले, काठ्या, दंड, बंदुका तसेच दगडफेक किंवा हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता सभा आयोजित करणे किंवा मिरवणुका काढणे यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा भडकावू भाषणे करणे यांनाही मनाई करण्यात आली आहे.

शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक पुतळे, चित्रे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन अथवा दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच समाजात तणाव निर्माण होईल किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल अशा प्रकारची वक्तव्ये, प्रचार साहित्य किंवा द्वेष पसरवणारे संदेश प्रसारित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावण्यासाठी शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. कायदेशीर परवानगी असलेल्या सुरक्षा यंत्रणांनाही या आदेशाचा अपवाद लागू राहणार आहे.

दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहरातील शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक वातावरण कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.