Home Breaking News Pune  : पुढच्या दोन दिवसांत पुण्यातील 80 टक्के हॉटेल बंद होण्याची भीती; विद्यार्थी...

Pune  : पुढच्या दोन दिवसांत पुण्यातील 80 टक्के हॉटेल बंद होण्याची भीती; विद्यार्थी चिंतेत.

45
0

Pune  : पुढच्या दोन दिवसांत पुण्यातील 80 टक्के  हॉटेल बंद होण्याची भीती; विद्यार्थी चिंतेत.

पुढील दोन दिवसानंतर पुणेकरांचं टेन्शन वाढणार…अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आता तुमच्या घरापर्यंत येऊन ठेपला आहे.जिभेचे चोचले पुरवणारे हे पुण्याच्या एका प्रसिद्ध दुकानातले पदार्थ. पण आता हे पदार्थ पुढचे काही दिवस चित्रातच पाहावे लागणार की काय, अशी परिस्थिती आहे.युद्धामुळे पुण्यातल्या हॉटेल्सना एलपीजी गॅस मिळत नाहीय.  परिणामी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आलीय.

पुण्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय. शहरातल्या एकाही गॅस केंद्रावर व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नाही. ज्या व्यावसायिकांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सिलिंडर घेऊन ठेवले होते, त्यांची सोय होऊ शकते. मात्र सध्या नव्या सिलिंडरची मागणी पूर्ण होणार नाही. या सगळ्यामुळे पुण्यातल्या हॉटेल व्यवसायिकांचे दोन दिवसांपासून मोठं नुकसान होतंय. मोठमोठ्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. हॉटेलमधले मेन्यू कमी होतील.

अनेक हॉटेल्समध्ये गॅस नसल्याने चुलीवर अन्न शिजवलं जातंय. मात्र त्यामध्ये वेळ जातोय आणि ग्राहकांना वेळेवर सेवा देता येत नाही. व्यावसायिक गॅसचा पुरवठा पुण्यात बंद असल्याने दोन दिवसांत हॉटेल व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

पुढच्या दोन दिवसांत अनेक हॉटेल्स बंद करावी लागतील, अशी परिस्थिती आहे. सध्या पुण्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला असून फक्त घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या तरी घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १५ हजार लघुउद्योग आहेत. त्यापैकी जवळपास साडे सात हजार कंपन्यांना गॅस टंचाईची झळ बसतेय. अनेक कंपन्यांकडचा गॅससाठा संपलाय.

पुण्यात शिक्षण आणि आयटी हब असल्यानं अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्यातल्या हॉटेलमध्येच भूक भागवतात. मात्र युद्धाची झळ बसल्यानं हॉटेल्सचंही मोठं नुकसान होतंय आणि अनेक पुणेकरांनाही भूक भागवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची शोधाशोध करावी लागणार आहे