पुणे : युपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन–2026 (CDS) परीक्षेच्या तयारीसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्तीअंतर्गत इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान (भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण) तसेच सामान्य विज्ञान (अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या विषयांसाठी पात्र आणि अनुभवी शिक्षकांची निवड केली जाणार आहे.
नियुक्त करण्यात येणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांना ३०० रुपये प्रती तासिका मानधन देण्यात येणार असून, ही संधी संरक्षण सेवांमध्ये जाण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. सीडीएस परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार दर्जेदार अध्यापन मिळावे, यासाठी अनुभवी आणि विषयतज्ज्ञ प्राध्यापकांची निवड केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. संरक्षण सेवांच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची आवड आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
पात्र उमेदवारांनी दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संपूर्ण शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे घेऊन थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल विलास शंकर सोनवणे (नि.), प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांनी केले आहे. मुलाखत स्थळ – छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक असे राहील.
या तात्पुरत्या नियुक्तीमुळे सीडीएस 2026 परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळणार असून, संरक्षण सेवांमध्ये जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. अधिक माहितीसाठी ९१५६०७३३०६ किंवा ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.