अकोला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते हिदायतुल्लाह पटेल (वय ६६) यांची धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाला गावातील जामा मशिदीबाहेर ही धक्कादायक घटना घडली. मंगळवारी दुपारच्या नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडत असताना अज्ञात युवकाने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायतुल्लाह पटेल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी वैयक्तिक रंजिश या हल्ल्यामागील कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोहाला गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिदायतुल्लाह पटेल हे काँग्रेस पक्षातील अनुभवी, शांत स्वभावाचे आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणारे नेते म्हणून ओळखले जात होते. सामाजिक सलोखा, अल्पसंख्याक प्रश्न आणि स्थानिक विकासासाठी त्यांनी सातत्याने काम केले. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
ठळक मुद्दे
-
काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हिदायतुल्लाह पटेल यांची हत्या
-
अकोला जिल्ह्यातील मोहाला गावातील जामा मशिदीबाहेर घटना
-
नमाजानंतर बाहेर पडताना धारदार शस्त्राने हल्ला
-
उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू
-
आरोपी अटकेत, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त