प्रयागराज माघ मेळा सोडल्यानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उत्तर प्रदेश सरकारवर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. वाराणसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी थेट आव्हान देत म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी ४० दिवसांच्या आत आपण हिंदू असल्याचा पुरावा सादर करावा, अन्यथा त्यांनी परिधान केलेला गेरुआ हा केवळ दिखाव्यासाठी आहे, असे मानले जाईल.
अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, “माझ्याकडून शंकराचार्य असल्याचा पुरावा मागितला गेला होता. मी तो दिला आणि तो खरा असल्याने तो स्वीकारावा लागला. आता पुरावे मागण्याची वेळ संपली आहे. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या हिंदुत्वाचा पुरावा द्यावा.”
यावेळी त्यांनी गायेला ‘गोमाता’ घोषित करण्याची स्पष्ट मागणी केली. “जर सरकार खरोखरच हिंदू मूल्यांवर विश्वास ठेवत असेल, तर गायेला अधिकृतपणे गोमाता घोषित करण्यास विलंब का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच धार्मिक विषयांवर केवळ घोषणा न करता ठोस निर्णय आणि कृती अपेक्षित असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शंकराचार्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, धार्मिक आणि राजकीय वर्तुळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. समर्थकांनी या वक्तव्याचे स्वागत केले असले तरी विरोधकांनी याला राजकीय प्रसिद्धीसाठी केलेले विधान असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, सरकारकडून या वक्तव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.