Home Breaking News मुंबई पावसाचा कहर : महापालिकेची आपत्कालीन बैठक, ३५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

मुंबई पावसाचा कहर : महापालिकेची आपत्कालीन बैठक, ३५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

91
0
मुंबईत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने थैमान घातले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देऊन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून सध्याची परिस्थिती व उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.
गेल्या ६ तासांत तब्बल २०० मिलिमीटर तर २४ तासांत ३५० मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे मुंबईतील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पाणी उपसा करण्यासाठी पालिकेचे ५२५ पंप तत्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. परिस्थिती लक्षात घेता पंपांची संख्या वाढवण्याचे स्पष्ट निर्देश महापालिकेने दिले.
मिठी नदीची पाणीपातळी ३.९ मीटरपर्यंत पोहोचल्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरात पाणी शिरले. या ठिकाणी जवळपास ३५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी जेवणाची तसेच आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे.
मुंबईतील घाटकोपर, कुर्ला व विक्रोळी पार्कसाईट येथे जिओ नेटिंगचे काम करण्यात आले आहे. दरडप्रवण भागातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय देखील महापालिकेने स्पष्ट केला आहे.
रेल्वे सेवेत खंड पडल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टकडून संध्याकाळी अतिरिक्त बसेस सोडण्याचीही तयारी करण्यात आली आहे. महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत पुन्हा एकदा पावसामुळे जनजीवन ठप्प झाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुंबईत मुसळधार पाऊस : ३५० नागरिकांचे स्थलांतर, महापालिकेची युद्धपातळीवरील उपाययोजना