नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात तर निकालांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे. नागपूरमधील हिंसा आणि दंगलीच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानच्या पत्नीने महापालिका निवडणुकीत विजय मिळवला असून, त्यानंतर फहीम खानने भाजपाला थेट इशारा दिला आहे.
पत्नीच्या विजयानंतर फहीम खानने माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेशमधील “बुलडोझर पॉलिटिक्स”चा उल्लेख करत म्हटले की, अशी धोरणे महाराष्ट्रात चालणार नाहीत. कोणाचाही थेट उल्लेख न करता त्याने सत्ताधाऱ्यांना इशारा देत सांगितले की, “तुम्ही एक फहीम खानला अटक केली, पण आज आमच्याकडून सहा नेते निवडून आले आहेत.” या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
नागपूर महानगरपालिकेतील या निकालांनी सत्ताधाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे केले आहे. ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप आहेत, त्याच्या कुटुंबातील सदस्याला जनतेने दिलेला कौल हा केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून, तो एक सामाजिक संदेश मानला जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निकाल असंतोष, स्थानिक प्रश्न आणि राजकीय ध्रुवीकरणाचे प्रतिबिंब आहे.
दरम्यान, भाजपकडून या वक्तव्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर राज्य सरकार कठोर भूमिका कायम ठेवणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. नागपूरसारख्या संवेदनशील शहरात अशा प्रकारच्या विधानांमुळे सामाजिक सलोखा आणि शांततेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवे वळण आले असून, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात संघर्ष आणि विधानांची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.