दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) सहभाग घेऊन मुंबईत आगमन झाल्यानंतर शिवसेना नेतृत्वाचे ऑल एअरपोर्ट्स इंडिया एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन (AIAEU) यांच्या वतीने जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा स्वागत सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या स्वागतानंतर शिवसेनेच्या धोरणांची प्रचिती देणारा एक महत्त्वाचा लोकहितकारी उपक्रम प्रत्यक्षात उतरवण्यात आला. “फक्त घोषणा नाहीत, थेट जनतेच्या उपयोगाची कामे” या स्पष्ट भूमिकेतून महाराष्ट्रभर मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम गरजू, गरीब आणि आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या प्रसंगी जय जवान गोविंदा पथकाचे संस्थापक, अध्यक्ष व प्रशिक्षक श्री. संदीप ढवळे तसेच कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक श्री. विवेक कोचरेकर यांच्याकडे रुग्णवाहिकेच्या चाव्या औपचारिकरीत्या सुपूर्द करण्यात आल्या. या माध्यमातून सामाजिक, क्रीडा आणि आपत्कालीन सेवेत कार्यरत असलेल्या संघटनांना थेट मदतीचा हात देण्यात आला आहे.
कार्यक्रमास आमदार मुरजी पटेल, कुणाल सरमळकर (जनरल सेक्रेटरी, AIAAU), संजू शहा, नगरसेवक रितेश राय यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करत शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट करण्यात आले की, “शिवसेना म्हणजे शब्द नव्हे, तर सेवा, संघर्ष आणि जनतेशी अखंड बांधिलकी.” ही मोफत रुग्णवाहिका सेवा राज्यातील ग्रामीण व शहरी भागात आपत्कालीन आरोग्यसेवेला गती देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या लोकहितकारी उपक्रमाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, भविष्यातही अशाच प्रकारचे थेट जनतेच्या हिताचे उपक्रम राबवले जातील, असे संकेत देण्यात आले.