Home Breaking News गोरखपूरमध्ये बनावट IPS चा धक्कादायक पर्दाफाश – विद्यापीठातील निलंबित लिपिक बनला खंडणीखोर...

गोरखपूरमध्ये बनावट IPS चा धक्कादायक पर्दाफाश – विद्यापीठातील निलंबित लिपिक बनला खंडणीखोर अधिकारी

25
0
गोरखपूर :
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पोलिसांच्या नावाने दहशत निर्माण करणाऱ्या एका बनावट IPS अधिकाऱ्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. “दोन दिवसांत दोन लाख रुपये दे, नाहीतर खुनाचा गुन्हा दाखल करून एन्काऊंटर करीन,” अशी धमकी देत एका कपड्याच्या व्यापाऱ्याकडून खंडणी मागणाऱ्या आरोपीला गोरखपूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस तपासात समोर आले की, हा आरोपी गोरखपूर विद्यापीठातील एका विभागात लिपिक म्हणून कार्यरत होता. सध्या तो निलंबित अवस्थेत आहे. मात्र, अधिकाऱ्याची वर्दी परिधान करून स्वतःला IPS अधिकारी असल्याचे भासवत तो लोकांमध्ये भीती निर्माण करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून IPS वर्दी जप्त केली असून, सोशल मीडियावर वर्दीतील फोटो पोस्ट करून तो “भौकाल” निर्माण करत असल्याचेही उघड झाले आहे.
या बनावट ओळखीच्या जोरावर त्याने अनेक नागरिकांना धमकावून आधीही पैसे उकळल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. व्यापाऱ्याला मिळालेल्या धमकीनंतर पीडिताने स्वतः चौकशी सुरू केली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले.
शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून तो सध्या तुरुंगात आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, “वर्दीचा गैरवापर करून सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही घटना समाजात वाढत चाललेल्या बनावट ओळख आणि सायबर माध्यमांच्या गैरवापराकडे लक्ष वेधणारी आहे. केवळ फोटो आणि वर्दीच्या जोरावर लोकांची फसवणूक केली जात असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.