नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये भारताला सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. विशेष बाब म्हणजे, पाकिस्ताननेही काही तास आधी आपणालादेखील असेच निमंत्रण मिळाल्याचा दावा केला आहे. या घडामोडीमुळे दक्षिण आशियातील दोन प्रतिस्पर्धी देश एकाच आंतरराष्ट्रीय मंचावर गाझा प्रश्नावर भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा ‘पीस बोर्ड’ अमेरिका मध्यस्थीने इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग आहे. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा भागातील पुनर्बांधणी, प्रशासकीय रचना, गुंतवणूक, पायाभूत सुविधा उभारणी आणि आंतरराष्ट्रीय निधी उभारणी यावर देखरेख करण्याची जबाबदारी या बोर्डाकडे असणार आहे.
रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या एका अमेरिकन पत्राच्या प्रतीनुसार आणि मसुदा सनदेनुसार, या बोर्डाचे अध्यक्षपद स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भूषवणार आहेत. सुरुवातीला हा मंच गाझा संघर्षावर लक्ष केंद्रित करेल आणि नंतर जगातील इतर संघर्षग्रस्त भागांमध्येही शांतता प्रस्थापित करण्यासाठी विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.
भारताचा या बोर्डमध्ये समावेश होणे हे जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या विश्वासार्हतेचे द्योतक मानले जात आहे. शांतता प्रस्थापना, पुनर्बांधणी आणि मानवीय मदत या क्षेत्रात भारताचा अनुभव आणि भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायासाठी महत्त्वाची ठरू शकते. दुसरीकडे, पाकिस्तानचाही सहभाग असल्याने या मंचावर भारत-पाकिस्तान यांच्यातील अप्रत्यक्ष राजनैतिक संवादाची शक्यता निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, या बोर्डमधील सहभागामुळे भारताला मध्य-पूर्वेतील घडामोडींमध्ये अधिक प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळेल. तसेच, जागतिक शांतता प्रक्रियेत भारत एक जबाबदार आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे येईल. गाझाच्या पुनर्बांधणीसाठी होणाऱ्या निर्णयांमध्ये भारताचा आवाज महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत.