Home Breaking News खेडशिवापूर परिसरात जुगार अड्ड्यावर धडक कारवाई, मात्र अवैध धंद्यांचे जाळे अजूनही बिनधास्त

खेडशिवापूर परिसरात जुगार अड्ड्यावर धडक कारवाई, मात्र अवैध धंद्यांचे जाळे अजूनही बिनधास्त

183
0
भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत चाललेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया सुरू असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र हायवे लगत व ग्रामीण भागात दोन नंबरचे धंदे खुलेआम सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर खेडशिवापूर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना रंगेहाथ पकडले, तर त्यांच्याकडून २७ हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास खेडशिवापूर (ता. हवेली, जि. पुणे) येथील कोंढणपूर फाटा परिसरात, मुक्तांगण हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असता जुगार खेळवला जात असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत बसवराज तुकाराम भुसारे (रा. पिंपरी-चिंचवड) हा राजु किसन कोंडे (रा. खेडशिवापूर) याच्या सांगण्यावरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडे विशिष्ट आकडे असलेले चार्ट आढळून आले असून, त्या आधारे आकडे देत जुगार खेळवला जात होता, हे तपासात उघड झाले आहे. छाप्यात २७ हजार रुपये रोख रक्कम, आकड्यांचे चार्ट व इतर जुगाराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
मात्र ही एकमेव कारवाई पुरेशी नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटू लागली आहे. राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हायवे लगत तसेच काही ग्रामीण भागांमध्ये जुगार, अवैध व्यवसाय व इतर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः हायवे परिसरातील मोकळ्या जागा, हॉटेलच्या पाठीमागील भाग व तात्पुरत्या शेडमध्ये असे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
“एक-दोन कारवायांपुरते समाधान न मानता, या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आणि कठोर आळा घालणे गरजेचे आहे. हायवे पट्ट्यात सुरू असलेल्या सर्व दोन नंबरच्या धंद्यांचे विशेष सर्वेक्षण करून त्यांचा समूळ नायनाट करण्यात यावा,” अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधीक्षक कार्यालयाने तातडीने दखल घ्यावी आणि राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात ठोस, व्यापक व परिणामकारक कारवाईचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा भविष्यात सामाजिक गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.