Home Breaking News अनुभवी व निर्भीड नेतृत्वाची निवड; नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या शेगाव तालुका अध्यक्षपदी...

अनुभवी व निर्भीड नेतृत्वाची निवड; नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या शेगाव तालुका अध्यक्षपदी शेख अमीन शेख, उपाध्यक्षपदी प्रफुल्ल साबळे

67
0
पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने आणि ठामपणे आवाज उठवणारे, अभ्यासू व निर्भीड पत्रकार शेख अमीन शेख यांची नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम पत्रकार संघटनेच्या शेगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी पत्रकार प्रफुल्ल साबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीमुळे शेगाव तालुक्यातील पत्रकार संघटनेला नवे बळ मिळाले आहे.
ही महत्त्वपूर्ण निवड दि. 22 डिसेंबर 2025 रोजी शेगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत पत्रकार संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली असून, संघटना अधिक संघटित, सक्षम आणि प्रभावी करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्याच्या जोरावर अमीन शेख यांनी नेहमीच पत्रकारांच्या समस्या, अडचणी, सुरक्षितता आणि न्यायहक्कासाठी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीमुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे ते पत्रकारांमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली शेगाव तालुक्यातील पत्रकार संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या बैठकीस नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (प्रभारी) देवचंद्र समदूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा महासचिव रामेश्वर खरात यांनी अधिकृतपणे या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शितल शेगोकार, तसेच संघटनेचे पदाधिकारी मुकेश हॅलोडे, श्याम सुरवाडे, प्रदीप सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त अध्यक्ष अमीन शेख आणि उपाध्यक्ष प्रफुल्ल साबळे यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी आणि व्यावसायिक हक्कांसाठी संघटितपणे व प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवून ठेवत, नव्या पिढीतील पत्रकारांना योग्य दिशा देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत संघटनेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे शेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.