Home Breaking News ‘मिसिंग लिंक’चा रिअल इस्टेटला मोठा फायदा; कामशेत-तळेगावातील मालमत्तांना वाढती मागणी.

‘मिसिंग लिंक’चा रिअल इस्टेटला मोठा फायदा; कामशेत-तळेगावातील मालमत्तांना वाढती मागणी.

34
0

‘मिसिंग लिंक’चा रिअल इस्टेटला मोठा फायदा; कामशेत-तळेगावातील मालमत्तांना वाढती मागणी.

Mumbai:२८ जून ; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३ किलो मीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ (कनेक्टिंग लिंक) प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कामशेत आणि तळेगाव परिसरातील रिअल इस्टेट बाजाराला मोठी चालना मिळाली आहे. प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची खात्री झाल्यानंतर मालमत्तांच्या किमतीत सुरुवातीला ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली होती. आता अनेक ठिकाणी मालमत्ता १५ ते २० टक्के वाढीव दराने विकल्या जात असल्याची माहिती स्थानिक इस्टेट एजंटांनी दिली आहे.

खंडाळा आणि लोणावळ्यातील मालमत्तांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अनेक खरेदीदारांनी कामशेत आणि तळेगावकडे मोर्चा वळवला आहे. विशेषतः वीकेंड होम, फार्महाऊस आणि गुंतवणुकीसाठी या भागाला पसंती मिळत आहे. निसर्गरम्य वातावरण आणि द्रुतगती मार्गाशी सुधारलेली जोडणी यामुळे या परिसरातील भूखंड आणि व्हिला प्रकल्पांची मागणी वाढली आहे.

हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्राच्या जवळ असल्याने तळेगाव दाभाडे परिसर नोकरदारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येथे सध्या मालमत्तेचा सरासरी दर सुमारे ₹४,९३४ प्रति चौरस फूट असून गुंतवणूकदारांना ६ टक्क्यांपर्यंत भाडे उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, ‘नाईट फ्रँक’च्या सर्वेक्षणानुसार, ‘मिसिंग लिंक’मुळे पारंपरिक पर्यटनस्थळांबरोबरच नव्या भागांनाही मागणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-पुणे महामार्गालगत गोदामे, निवासी प्रकल्प आणि इतर बांधकाम व्यवसायालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी व्यक्त केला आहे.