Home Breaking News दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणात उघड झाले मोठे गुपित! तपासात समोर...

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणात उघड झाले मोठे गुपित! तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

53
0
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटप्रकरणी तपास यंत्रणांना आता अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. उमर-ऊ-नबी नावाच्या संशयिताने स्वतःच्या अटकेच्या भीतीनेच हा स्फोटाचा कट रचल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी आणि तपासापासून बचाव करण्यासाठी कारमध्ये डेटोनेटर लावून स्फोट घडवून आणल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. या स्फोटामुळे संपूर्ण दिल्ली हादरली असून, सुरक्षा यंत्रणांनी उच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिर आणि शिर्डी येथील साई मंदिरात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाविकांच्या बॅगा, पर्स आणि सामानाची कसून तपासणी केली जात असून, हँड मेटल डिटेक्टर, फ्रेम मेटल डिटेक्टर आणि स्कॅनरचा वापर वाढवण्यात आला आहे.
शिर्डी साई मंदिरात दररोज लाखो भाविक येत असल्याने आणि अलीकडेच काही धमकीचे ईमेल्स प्राप्त झाल्यामुळे बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच पोलीस दल कायम तैनात ठेवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात सीसीटीव्ही देखरेख अधिक वाढवण्यात आली असून, प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा रक्षक गस्त घालत आहेत.
या घटनेनंतर संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणांची धांदल उडाली असून, नागरिकांना संशयास्पद वस्तू किंवा हालचालींबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू केला आहे.