Home Breaking News ठाकरेंना लोणावळ्यात मोठा धक्का! माजी नगरसेवक शिवदास पिल्ले यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरेंना लोणावळ्यात मोठा धक्का! माजी नगरसेवक शिवदास पिल्ले यांचा शिंदे गटात प्रवेश

130
0
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक शिवदास पिल्ले तसेच उपशहरप्रमुख नरेश काळवीट यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवले आहेत. हा प्रवेश सोहळा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, तसेच युवासेनेचे विशाल हुलावळे, दत्ता केदारी आणि नवनाथ हरपुडे उपस्थित होते. या प्रवेशामुळे लोणावळ्यातील ठाकरे गटाची पकड सैल होताना दिसत असून, शिंदे गटाने आपल्या संघटनशक्तीला बळकटी दिली आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून, दुसऱ्याच दिवशी या प्रवेशामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. खासदार बारणे यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीलच खरी शिवसेना आहे”, आणि राज्यभरातील अनेक ठिकाणी ठाकरे गटातील पदाधिकारी आता शिंदे गटात दाखल होत आहेत.
बारणे यांनी पुढे सांगितले की, लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना ताकदीने लढविणार असून, पक्षातील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाईल. तसेच, तळेगाव दाभाडे शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चासत्रे सुरू आहेत, तर वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपसोबत लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनाक्रमामुळे ठाकरे गटाच्या गोटात चिंता पसरली असून, लोणावळा परिसरातील आगामी निवडणुकीत शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटासाठी ही भर म्हणजे निवडणुकीपूर्वीचा आत्मविश्वासवर्धक टप्पा ठरू शकतो.