Home Breaking News चाकनमध्ये अतिक्रमणाचा भडीमार; जिल्हा परिषद शाळेपासून बाजारापर्यंत वाहतुकीचा खोळंबा!

चाकनमध्ये अतिक्रमणाचा भडीमार; जिल्हा परिषद शाळेपासून बाजारापर्यंत वाहतुकीचा खोळंबा!

122
0
पुणे जिल्ह्यातील चाकन परिसरात अतिक्रमणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून ते बाजार मार्केटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावर पथारीवाल्यांनी, दुकानांनी आणि काही स्थानिकांनी जागा अडवून ठेवली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून, शालेय विद्यार्थ्यांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाला या संदर्भात तक्रारी दिल्या असूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांचे म्हणणे आहे की, “पथदिवे, वाहतुकीचे सिग्नल असूनही अतिक्रमणामुळे वाहतुकीचा अराजक निर्माण झाला आहे.”
शाळेजवळील गर्दीमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालक आणि रहिवाशांनी प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, जर प्रशासन वेळेवर कारवाई करत नसेल, तर “अधिकारी आणि अतिक्रमण करणाऱ्यांमधील संगनमत” असल्याचा संशय नाकारता येत नाही.
वाहतुकीच्या सुरळीततेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिकांनी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या तक्रारींवर आता चाकन पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबवावी, अशी मागणी होत आहे.