Home Breaking News सोने दरात झपाट्याने वाढ! गुंतवणूकदारांचा कल ‘सेफ हेवन’कडे – जाणून घ्या मुंबई,...

सोने दरात झपाट्याने वाढ! गुंतवणूकदारांचा कल ‘सेफ हेवन’कडे – जाणून घ्या मुंबई, पुणे, दिल्लीतील आजचे दर!

35
0
मुंबई : जागतिक बाजारातील अनिश्चितता, अमेरिकेतील बँकांची आर्थिक कमकुवत स्थिती आणि व्याजदरात कपात होण्याच्या अपेक्षांमुळे आज (१७ ऑक्टोबर) सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या भावातही उसळी दिसून आली आहे. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे वळल्याने बाजारात मोठी हालचाल दिसून आली आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ₹१,३२,७०० तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२१,७०० इतका नोंदवला गेला आहे. या दरामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
त्याचवेळी चांदीचा दरही झपाट्याने वाढून ₹१,८५,००० प्रति किलो इतका झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती:
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ०.३% वाढून $४,३३६.१८ प्रति औंस झाला आहे. एका सत्रात तो $४,३७८.६९ या उच्चांकावर पोहोचला होता. डिसेंबर महिन्यात वितरणासाठी असलेल्या यूएस गोल्ड फ्युचर्सचा दर १% वाढून $४,३४८.७० प्रति औंस झाला आहे.
चादीबाबत सकारात्मक अंदाज:
एमके वेल्थ मॅनेजमेंटच्या अहवालानुसार, पुढील एका वर्षात चांदीच्या दरात सुमारे २०% वाढ होण्याची शक्यता असून दर $६० प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो. औद्योगिक मागणी वाढणे आणि पुरवठ्यातील सातत्याने असलेली कमतरता यामुळे हा वाढीचा कल कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतातील सोन्याच्या दरावर परिणाम करणारे घटक:
भारतातील सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, आयात शुल्क, कर आणि डॉलरच्या विनिमय दरातील बदलांवर अवलंबून असतात.
सोन्याला भारतात केवळ गुंतवणुकीचे साधन म्हणूनच नव्हे, तर सांस्कृतिक परंपरेचा एक भाग म्हणूनही मान दिला जातो. लग्न, सण आणि शुभ प्रसंगांमध्ये सोन्याला विशेष स्थान आहे.
बदलत्या बाजारस्थितीत गुंतवणूकदार आणि व्यापारी दररोज सोन्याचे दर लक्षपूर्वक पाहत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सध्या पुन्हा एकदा सोनेच सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.