Home Breaking News समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करा – डॉ. प्रसाद प्रधान यांचे विद्यार्थ्यांना...

समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करा – डॉ. प्रसाद प्रधान यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन-पीसीयू ‘इन्स्पिरा’ मालिकेतून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट यशासाठी दिशा

44
0
पिंपरी, पुणे – “कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फक्त शैक्षणिक गुण नव्हे, तर समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, लवचिकता आणि जबाबदारी घेण्याची वृत्ती आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान कार्यालयाचे माजी अर्थ सल्लागार व जागतिक अर्थतज्ञ डॉ. प्रसाद प्रधान यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) “इन्स्पिरा” या उद्योग-विद्यापीठ संवाद मालिकेअंतर्गत ‘जनरल अवेअरनेस ऑन कॉर्पोरेट रिक्वायरमेंट फ्रॉम फ्रेशर्स – कॅम्पस टू करिअर’ या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले.
 
या प्रसंगी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र-उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, औद्योगिक संबंध संचालक डॉ. प्रणव चरखा, समन्वयक जमीर मुल्ला, डॉ. अमित पाटील आणि डॉ. कमलेश मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रसाद प्रधान यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “पहिली नोकरी ही तुमच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात असते. डिजिटल युगात सतत शिकण्याची तयारी, आत्मविश्वास, आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता महत्त्वाची ठरते.”
ते पुढे म्हणाले, “ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) धोरणामुळे भारतात परदेशी गुंतवणुकीत वाढ होत असून, नव्या रोजगार संधी निर्माण होत आहेत. औषधनिर्माण, डेटा सायन्स आणि फिनटेक क्षेत्रात प्रचंड वाढीची शक्यता आहे.” त्यांनी भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “भारत आता केवळ कामगार देश नाही तर डिजिटल नेतृत्वाचे केंद्र बनत आहे.”
डॉ. गिरीश देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना सांगितले की, “पीसीयू इन्स्पिरा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील वास्तव परिस्थितीची ओळख करून देण्यासाठी राबवला जातो. आमचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर नव्हे, तर उद्योगसंपृक्त व्यावसायिक बनवणे आहे.” डॉ. प्रणव चरखा यांनी सांगितले की, “पिंपरी चिंचवड विद्यापीठ उद्योग-जगतातील गरजा ओळखून शिक्षणात नाविन्य आणत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आमचे ध्येय आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता राजगौरव यांनी केले तर संगीता मुखर्जी यांनी आभार मानले. कार्यक्रम पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. डॉ. प्रसाद प्रधान यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली. त्यांनी विद्यार्थ्यांना “नोकरीत टिकण्यासाठी नव्हे, तर यश मिळवण्यासाठी काम करा” असा संदेश देत प्रेरणा दिली.