Home Breaking News साखळी हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीला पोलीसांचा चाप, मोठ्या कारवाईत लाखो रुपयांच्या मालाची...

साखळी हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीला पोलीसांचा चाप, मोठ्या कारवाईत लाखो रुपयांच्या मालाची जप्ती

97
0
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून चैन स्नॅचिंगच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. विशेषतः हडपसर व आसपासच्या परिसरातील महिलांना गर्दीच्या ठिकाणी लक्ष्य केले जात होते. संध्याकाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हिसकावून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली होती.
या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा बैठकीत कठोर कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात विशेष बैठक घेतली आणि तपास अधिकाऱ्यांना वेगवान व काटेकोर तपास करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि. निलेश जगदाळे व पोनि. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संशयितांची हालचाल बारकाईने अभ्यासली. तपासातून असे उघड झाले की, हे आरोपी रात्री ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान शेवाळवाडी भाजी मार्केट, महादेव मंदिर, गाडीतळ, हडपसर व मांजरी परिसरात महिलांना लक्ष्य करून गुन्हे करत होते. गुन्हा केल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गाने पसार होण्याची सोय आरोपींना मिळत होती.
१८ ऑगस्ट २०२५ रोजी पेट्रोलिंगदरम्यान हडपसर तपास पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी वेळोवेळी चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे –
१) अनिकेत विजय चव्हाण (रा. खुणेश्वर, जि. सोलापूर, सध्या हडपसर)
२) ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण (रा. खुणेश्वर, जि. सोलापूर)
तपासादरम्यान या दोघांकडून हडपसर पोलीस ठाण्यातील तब्बल ५ गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून ₹७,०४,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात सोन्याचे दागिने (४५.५४० ग्रॅम), रोख, दोन दुचाकी (होंडा युनिकॉर्न, हिरो एक्स्ट्रीम), बनावट नंबर प्लेट्स, स्क्रू ड्रायव्हर, मास्क व काळी पिशवी यांचा समावेश आहे.
यापैकी आरोपी ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण याच्यावर हडपसर, वानवडी, सिंहगड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ व समर्थ पोलीस ठाण्यांत चैन स्नॅचिंगचे तब्बल १६ गुन्हे नोंदलेले आहेत.
ही कामगिरी मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या देखरेखीखाली पार पडली.
संपूर्ण कारवाईत तपास पथकातील अधिकारी व अंमलदार – हसन मुलाणी, सत्यवान गेंड, महावीर लोंढे, माधव हिरवे तसेच इतर सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तात्काळ आणि धाडसी कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिस दलाच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.