भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील शैक्षणिक सहकार्याला एक नवा आयाम देणारा महत्वाचा टप्पा नुकताच गाठला गेला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) दक्षिण कोरियातील नामांकित सोगांग विद्यापीठासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारामुळे शैक्षणिक संबंध अधिक दृढ होणार असून, दोन्ही देशांतील विद्यार्थी व प्राध्यापकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या कराराबद्दल बोलताना सोगांग विद्यापीठाचे उपाध्यक्ष व उपसंचालक प्रा. ली क्यू-ताई यांनी सांगितले की, “हा करार भारत-दक्षिण कोरिया उच्च शिक्षण क्षेत्रातील नातेसंबंधांना नवे बळ देईल आणि संशोधन व नवोन्मेषाच्या दृष्टीने नवे मार्ग खुल्या होतील.” तसेच ग्लोबल कोरियन स्टडीज विभागाचे अधिष्ठाता प्रो. किम डॉन्ग ताएक यांनी नमूद केले की, संस्कृतीवर आधारित शिक्षण व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या नव्या संधींना ही भागीदारी चालना देणार आहे.
या प्रसंगी पीसीयूचे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले की, “भारत-दक्षिण कोरिया दरम्यानच्या सहकार्यातून संयुक्त संशोधन प्रकल्प, नवोन्मेष व तंत्रज्ञान क्षेत्रातील उपक्रमांना मोठे प्रोत्साहन मिळेल.” प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी विद्यार्थ्यांच्या जागतिक दर्जाच्या शिक्षण, संशोधन संधी आणि करिअर विकासाच्या संधींवर या कराराचा दूरगामी परिणाम होईल असे सांगितले.
करारावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ग्लोबल कोरियन स्टडीज विभाग अधिष्ठाता प्रो. किम डॉन्ग ताएक, स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर युजिन हान, दक्षिण कोरियाचे स्टाराजिन, तसेच पीसीयूतील वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश होता.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, संगणक अनुप्रयोग, कायदा, फार्मसी, डिझाईन, विज्ञान व मीडिया या विविध क्षेत्रांतील संभाव्य सहकार्य, प्राध्यापक व विद्यार्थी देवाणघेवाण, तसेच संयुक्त शैक्षणिक कार्यक्रमांवर विशेष चर्चा करण्यात आली.
या करारामध्ये पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
हा करार पीसीयूच्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक परिसंस्था उभारणीच्या ध्येयाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे. यामुळे २१ व्या शतकातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे, जागतिक दृष्टी असलेले विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेला मोठी चालना मिळणार आहे.