मुंबई शहरात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती पसरली आहे. गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) संध्याकाळी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये असा धक्कादायक दावा करण्यात आला की, ‘लष्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले असून त्यांनी तब्बल ३४ गाड्यांमध्ये ४०० किलो आरडीएक्स ठेवले आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला जाईल आणि त्यामुळे १ कोटी लोक मृत्युमुखी पडतील’.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ हाय अलर्ट घोषित केला असून संपूर्ण शहरात तपासणी मोहीम आणि बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी, धार्मिक स्थळांवर, रेल्वे स्थानकांवर, मॉल्स, गर्दीच्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्या मेसेजमध्ये दहशतवाद्यांनी ‘मानवी बॉम्ब’ तयार केले असल्याचा दावा केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आधीपासूनच पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. मात्र या धमकीनंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल करून तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. मोबाईल नंबरचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या धमकीमुळे महाराष्ट्र पोलिसांसह केंद्रातील गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराला टार्गेट करून दहशतवादी पुन्हा अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मुंबई पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, भीती न बाळगता सतर्क राहावे, संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी.