Home Breaking News बीडकरांचे ऐतिहासिक स्वप्न साकार! बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा आजपासून सुरू

बीडकरांचे ऐतिहासिक स्वप्न साकार! बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा आजपासून सुरू

43
0
बीड – बीडकरांच्या जीवनात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. तब्बल 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प अखेर मार्गी लागला असून आज (17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर या रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.
बीडकरांसाठी ही केवळ एक रेल्वे सेवा नाही, तर त्यांच्या विकासयात्रेतील ऐतिहासिक टप्पा आहे. बीड शहरातील पालवण चौकात उभारलेले भव्य स्थानक आता प्रवाशांचे स्वागत करण्यास सज्ज झाले असून, पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगर असा 168 किमीचा प्रवास रेल्वे 5 तास 30 मिनिटांत पूर्ण करेल. या मार्गावर एकूण 16 स्थानकांवर थांबे असतील.
रेल्वेची वेळापत्रक
गाडी क्रमांक 71441 : सकाळी 6:55 वाजता अहिल्यानगरहून सुटणार आणि दुपारी 12:30 वाजता बीडला पोहोचणार.
गाडी क्रमांक 71442 : दुपारी 1:00 वाजता बीडहून सुटणार आणि सायं. 6:30 वाजता अहिल्यानगरला पोहोचणार.
सोमवार ते शनिवार धावणार; रविवारी सुट्टी.
 खर्चाची तुलना
बीड ते अहिल्यानगर रेल्वे तिकीट दर – केवळ ₹45.
रेल्वे प्रवासाचा वेळ – 5 तास 25 मिनिटे.
रस्ते मार्गाने भाडे ₹200 पर्यंत, वेळ 3 तास.
बीड बसस्टँड ते रेल्वे स्थानक (6 किमी) – रिक्षा भाडे ₹150–200.
 महत्त्वाचे थांबे
बीड, राजुरी, रायमोर, विगणवाडी, घाटनांदुर, आंबळनेर, बावी, किणी, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोह आणि अखेरीस अहिल्यानगर.
 प्रकल्पाची वैशिष्ट्ये
261 पैकी 166 किमी लोहमार्ग पूर्ण.
केंद्र-राज्य समान वाट्याचा प्रकल्प.
सुरुवातीला 355 कोटींचा असलेला प्रकल्प 4800 कोटींवर.
राज्य सरकारने आतापर्यंत 2241 कोटींचा निधी दिला.
आठवड्यात 6 दिवस सेवा; सुरुवातीला डिझेलवर धावणारी रेल्वे.
या उपक्रमामुळे बीडकरांचा प्रवास अधिक स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. रोजगार, व्यापार आणि शिक्षणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.