Home Breaking News नाशिकमध्ये दिवसाढवळ्या चोरीचा थरकाप उडवणारा प्रकार; पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील...

नाशिकमध्ये दिवसाढवळ्या चोरीचा थरकाप उडवणारा प्रकार; पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी लंपास

34
0
नाशिक | नाशिक शहरात पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांना हादरवून सोडले आहे. पंचवटीतील रामवाडी परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत, नंदिनी नायक नावाच्या महिलेला घरात एकट्या पाहून दोन अज्ञात चोरट्यांनी पाणी मागण्याचा बहाणा करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी सकाळी नंदिनी नायक या घरी एकट्या होत्या. त्याच वेळी तोंडाला मास्क घातलेले दोन युवक त्यांच्या घरासमोर आले. “काकू, पाणी द्या” असे म्हणत त्यांनी विश्वास संपादन केला. माणुसकीपोटी त्यांनी दार उघडून पाणी द्यायचा प्रयत्न केला, पण त्या क्षणीच चोरट्यांनी गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली. नंदिनी नायक यांनी चोरट्यांचा प्रतिकार करत एका चोरट्याचा टी-शर्ट पकडला व आरडाओरड सुरू केली. मात्र, चोरट्यांनी त्यांना जोराचा धक्का देत साखळी घेऊन पळ काढला. झटापटीत सोनसाखळीचा काही भाग खाली पडला, तरी चोरटे मुख्य दागिना घेऊन पसार झाले.
या घटनेनंतर नंदिनी नायक यांना मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, कठोर पावले उचलावीत आणि चोरट्यांना तत्काळ गजाआड करावे अशी मागणी केली आहे.