उत्तराखंड राज्यात पुन्हा एकदा निसर्गरौद्ररूप धारण करताना दिसला आहे. देहरादूनमधील प्रसिद्ध सहस्त्रधारा परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मोठी हानी झाली आहे. अवघ्या काही मिनिटांत मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि परिसरातील रस्ते, दुकाने, घरे पाण्याखाली गेली.
स्थानिक सूत्रांनुसार, ढगफुटी इतकी तीव्र होती की पाण्याच्या प्रचंड लाटांमध्ये सहस्त्रधारा परिसरातील अनेक दुकाने आणि लहान झोपड्या वाहून गेल्या. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, “आमच्या डोळ्यांसमोर माल आणि दुकानं वाहून जात होती, काहीही वाचवता आलं नाही.”
या नैसर्गिक आपत्तीचा फटका धार्मिक स्थळांनाही बसला आहे. देहरादूनमधील टपकेश्वर महादेव मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले. भाविकांनी घाबरून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मंदिर परिसरात अजूनही पाणी साचलेले असून प्रशासनाने खबरदारी म्हणून भाविकांचा प्रवेश तात्पुरता बंद केला आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे. काही ठिकाणी रस्ते खचले, तर काही ठिकाणी पूल कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पोलिस आणि SDRF च्या पथकांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
या ढगफुटीमुळे फक्त पायाभूत सुविधांचंच नाही, तर पर्यटकांच्याही हाल झाल्या आहेत. सहस्त्रधारा हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण आहे, मात्र सध्या येथे संचारबंदी लावून नागरिकांना आणि पर्यटकांना खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस डोंगराळ भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी नदी-नाल्यांच्या जवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.