मुंबई | प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या “ताज हॉटेल विकले जाणार” या अफवांना टाटा समूहाने आज पूर्णविराम दिला आहे. रतन टाटा यांच्या कंपनीकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलं की, ताज हॉटेल हे केवळ एक हॉटेल नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे आणि त्याची विक्री होणारच नाही.
‘ताज महाल पॅलेस हॉटेल’ ही इमारत भारतातील पाहुणचार संस्कृतीचं सर्वोच्च प्रतीक मानली जाते. जगभरातील सेलिब्रिटी, नेते, उद्योगपती इथं थांबलेले आहेत. हे हॉटेल विक्रीस काढलं जाईल, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. मात्र टाटा समूहाने या अफवांचा भंडाफोड करून जनतेला दिलासा दिला आहे.
या ऐतिहासिक हॉटेलामागची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे. १९०३ मध्ये रतन टाटा यांच्या पूर्वजांनी एक अपमान सहन केल्यानंतर या हॉटेलाची पायाभरणी केली होती. त्याकाळी वसाहतवादाच्या छायेखालील भारतात, काही हॉटेल्समध्ये भारतीयांना प्रवेश दिला जात नसे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून टाटा समूहाने भारतीयांच्या अभिमानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी ताज हॉटेल उभारलं.
आज शंभराहून अधिक वर्षांनंतरही हे हॉटेल केवळ मुंबईचं नव्हे तर भारताच्या गौरवाचं प्रतीक आहे. भारताच्या पर्यटन, पाहुणचार आणि संस्कृतीची ओळख या हॉटेलामुळे जगभर झाली आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातही ताज हॉटेल अभेद्यपणे उभं राहिलं आणि त्याचं पुनर्निर्माण भारताच्या जिद्दीचं प्रतीक ठरलं.
रतन टाटा यांनी स्वतः अनेकदा अधोरेखित केलं आहे की, ताज हॉटेल हे भारतीय जनतेचं आहे. त्याची विक्री होणार नाही तर पुढील पिढ्यांसाठी त्याचा विकास आणि संवर्धन केलं जाईल.