ठाणे : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या मेट्रो मार्ग-४ व ४ अ (चरण-१) या प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा आज पार पडला. गायमुख ते विजय गार्डन स्टेशन या मार्गावर तांत्रिक चाचणी आणि ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर व परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.
मेट्रो मार्ग-४ व ४ अ च्या कार्यान्वयनामुळे ठाणे, वर्तकनगर, कळवा, वाघबिल, घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गामुळे मुंबई-ठाणे प्रवासात लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा त्रास यात घट होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी सांगितले की, “महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय आज सुरू झाला आहे. ठाणेकरांना आरामदायी, सुरक्षित आणि जलद प्रवासाची सोय उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे.”
तर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ठाणे हे आपले हृदयस्थान असून, येथे मेट्रो प्रकल्प साकारल्याने नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे. हा प्रकल्प भविष्यातील पिढ्यांसाठी वरदान ठरेल.”
या ट्रायल रनमुळे ठाणे शहरात आधुनिकतेकडे वाटचाल आणि नवा विश्वास निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनीही याबाबत आनंद व्यक्त करत, लवकरात लवकर नियमित सेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली.