Home Breaking News लोणावळ्यात रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात मनसेचा आवाज बुलंद – त्वरित काम न झाल्यास तीव्र...

लोणावळ्यात रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात मनसेचा आवाज बुलंद – त्वरित काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

272
0
प्रतिनिधी – श्रावणी कामत
लोणावळा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शाखेच्या वतीने अध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील खराब रस्त्यांच्या त्वरित दुरुस्तीसाठी लोणावळा नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यात आले. गणेशोत्सव जवळ आला असताना देखील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित विभागाला निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक १ मधील न्यू तुंगारळी, इंदिरानगर, अंबरवाडी रोड, गोल्ड व्हॅली परिसर, प्रिचली हिल या भागातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वार, खड्ड्यांमुळे अपघाताच्या झटक्यात सापडत आहेत. सार्वजनिक वाहतूकही यामुळे विस्कळीत झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांवरून मिरवणुका निघणार असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे खड्डे तत्काळ बुजवले जावेत, अन्यथा मनसे आंदोलन छेडेल, असा ठणकाव नगरपरिषदेला करण्यात आला.
यावेळी मनसेचे प्रवक्ते अमित भोसले, संघटक अभिजित फासगे, सुनील साळवे, निलेश लांडगे, सुनील सोनावणे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, आकाश सावंत व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निखिल भोसले यांनी सांगितले की, “जनतेच्या सोयीसाठी प्रशासनाने वेळेत कार्यवाही करणे अपेक्षित आहे. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल आणि शहरातील नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष करेल.”
रस्त्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा मनसे मैदानात उतरेल!