चिंचवड : बीड-आष्टी-शिरूर विधानसभेचे आमदार सुरेश अण्णा धस यांचा पिंपरी चिंचवड शहरात भव्य आभार दौरा उत्साहात पार पडला. वाल्हेकर वाडीतील आहेर गार्डन येथे आयोजित या कार्यक्रमाला असंख्य नागरिक, मतदार आणि कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि सवाष्णींनी केलेल्या औक्षणाने अण्णांचे भव्य स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरासह पुणे, कोथरूड परिसरातील अनेक उद्योजक, उद्योगपती व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. अण्णांच्या स्वागतासाठी लोकांनी एकप्रकारे उत्सवाचे वातावरणच निर्माण केले होते.
आपल्या भाषणात आमदार धस म्हणाले – “मला मंत्रीपदाची हाव नाही. माझे ध्येय नेहमीच गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे. संतोष देशमुख प्रकरण असो वा महादेव मुंडे प्रकरण, प्रत्येक ठिकाणी मी जातीने लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला आहे. मेडिकल क्षेत्र, नोकरी क्षेत्र वा कामगार वर्ग – कोणत्याही क्षेत्रातील तरुण-तरुणींना मदतीची गरज भासली तर मी स्वतः पुढाकार घेऊन कार्यरत राहीन.”
त्यांनी पुढे सांगितले की, “आपल्या ग्रामीण भागातील कोणत्याही नागरिकांना पिंपरी चिंचवड, कोथरूड किंवा पुणे शहरात त्रास होत असेल, तर त्यांनी फक्त माझ्याशी संपर्क साधावा. मी त्वरित स्थानिक लोकप्रतिनिधींशी बोलून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. मी सर्वांसाठी २४ तास तत्पर असून, माझा समाज उच्च पदाला जाऊन चांगल्या प्रकारे जीवन जगेल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”
कार्यक्रमाच्या शेवटी आमदार धस यांनी उपस्थित सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील काळातही आपल्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.
“पिंपरी चिंचवडमध्ये आमदार सुरेश अण्णा धस यांचा आभार दौरा – ‘मला मंत्रीपदाची हाव नाही, सामान्य जनतेच्या सेवेसाठी २४ तास तत्पर आहे’”