Home Breaking News २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सहा दश लक्ष डॉलरचा टप्पा पार करेल –...

२०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सहा दश लक्ष डॉलरचा टप्पा पार करेल – वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांचा विश्वास

42
0
पिंपरी/पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करताना, भारतीय अर्थव्यवस्था २०४७ मध्ये सहा दश लक्ष डॉलरचा टप्पा पार करेल, असा ठाम विश्वास भारत आणि दुबई संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढे सांगितले की, या यशामध्ये भारतीय व विशेषत: मराठी उद्योजकांचे योगदान लक्षणीय असेल.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) यांच्या वतीने दुबई येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद २०२५ च्या उद्घाटन सोहळ्यात शिवन बोलत होते.
तीन दिवसीय या भव्य परिषदेत भारत व परदेशातील नामवंत उद्योजक, उद्योगतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि साहित्यिक सहभागी झाले आहेत. यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये पीसीयूचे कुलपती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, अल अली ग्रुपचे कार्यकारी संचालक एच. ई. याकुब अल अली, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार, ज्येष्ठ लेखक संदीप वासलेकर, गर्जे मराठी संस्थापक आनंद गानू, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, पीसीईटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, पद्माताई भोसले, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, संयोजक सचिन इटकर यांचा समावेश होता.
हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दुबई हे जागतिक उद्योगक्षेत्राचे प्रवेशद्वार असून, मराठी उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा योग्य फायदा घ्यावा. परिषदेच्या माध्यमातून नवउद्योजकांना व्यवसायातील मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होतील.
दुबईतील उद्योजक याकुब अल अली यांनी मराठी उद्योजकांना दुबईत व्यवसाय उभारण्यासाठी खुले आमंत्रण देत, “भारतीय उद्योजकांचे आम्ही मनापासून स्वागत करू आणि सर्वतोपरी सहकार्य करू,” अशी ग्वाही दिली.
ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी व्यवसायातील प्रामाणिकपणा आणि व्यवहारकुशलता या दोन बाबींचा उद्योजकांनी विसर पडू नये असे सांगितले, तर स्वामी ब्रह्मविहारी यांनी “व्यवसायाबरोबर नैतिकतेचे अधिष्ठान आवश्यक” असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी महाराष्ट्र सरकार नेहमीच उद्योगपतींसोबत राहील, उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व धोरणात्मक मदत मिळेल याची खात्री दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गिरीश देसाई यांनी मानले. हा सोहळा मराठी उद्योजकांच्या जागतिक पातळीवरील प्रगतीचे आणि भारताच्या आर्थिक महासत्ता होण्याच्या वाटचालीचे प्रतीक ठरला.
“दुबईत मराठी उद्योजकांची भव्य परिषद सुरू – २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सहा दश लक्ष डॉलरची : सतीशकुमार शिवन