भाजे–मळावली येथील संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूल ने पुन्हा एकदा सिद्ध केले की, ज्ञान, कला आणि संस्कृती यांचा संगम असलेली भारतीय परंपरा जागतिक मंचावरही तितकीच प्रभावी ठरते. बेलारूसच्या निसर्गरम्य झुब्रेनोक पार्क येथे ७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाल मेळाव्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारताचे अभिमानाने प्रतिनिधित्व करताना सर्वांचे मन जिंकले.
या कार्यक्रमात रशिया, बेलारूस, अझरबैजान, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन आणि उझबेकिस्तान या बेलारूसच्या मैत्रीपूर्ण देशांतील १४०० हून अधिक प्रतिभावंत विद्यार्थी सहभागी झाले होते. अशा भव्य मंचावर, शाळेच्या हुशार विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित प्रभावी सादरीकरण करून सर्वत्र कौतुकाची कमाई केली. त्यांच्या अभिनयात, वेशभूषेत आणि संवादात भारतीय संस्कृतीचा तेजस्वी झोत प्रकट झाला.
पुढील दिवशी पथकाने महाभारताच्या महाकाव्यावर आधारित अप्रतिम नाट्य सादर केले, ज्यामध्ये भारतीय तत्वज्ञान, युद्धनीती आणि कुटुंब मूल्यांचा सुंदर संगम दिसून आला. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त टाळ्यांचा वर्षाव करत उभे राहून अभिवादन केले.
एकूण २४ विद्यार्थी आणि २ शिक्षकांचे पथक ३ ऑगस्टपासून बेलारूसमध्ये वास्तव्य करत असून, १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने मळवलीत परतणार आहे. या दरम्यान त्यांनी विविध देशांतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत सांस्कृतिक व मैत्रीपूर्ण बंध अधिक घट्ट केले.
कार्यक्रमाच्या यशाबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि श्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा पाठवत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
संपर्क संस्थेचे संस्थापक संचालक व सचिव श्री अमितकुमार बॅनर्जी यांनी पुढील काळात भारतातील विविध राज्यांतील तसेच शेजारील देशांतील वंचित मुलांसाठी अशा सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांचे आयोजन करण्याची घोषणा केली. तसेच पुणे जिल्ह्यात सांस्कृतिक व आरोग्य पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचाही मनोदय व्यक्त केला.
या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार म्हणून श्री अमितकुमार बॅनर्जी, श्री सतीश माळी आणि सौ. राणी वाघमारे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त आणि कलागुण पाहून त्यांचे भरभरून कौतुक केले.