खोपोली, प्रतिनिधी श्रावणी कामत — जगभरात दरवर्षी ८ ऑगस्ट रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय मांजर दिन यंदाही खोपोलीत प्रेम, उत्साह आणि मांजरांच्या गोड चाळ्यांनी रंगला. श्री कृपा एक्वेरियम व पेट केअर सेंटर यांच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात, परिसरातील शेकडो मांजरप्रेमी आपल्या लाडक्या पाळीव मांजरांसह हजेरी लावून सणाला अधिकच रंगत आणली.
कार्यक्रमात सकाळपासूनच मांजरांच्या सौंदर्य, चपळाई आणि प्रेमळ स्वभावाचा आनंद लुटण्यासाठी मांजरप्रेमींची रांग लागली होती. विविध जातींच्या मांजरांनी ठिकाणी उपस्थित राहून “कॅट वॉक” मध्ये आपला जलवा दाखवला. काही मांजरांनी रंगीबेरंगी ड्रेस, बो आणि कॉलर लावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, तर काहींनी आपल्या नैसर्गिक सौंदर्याने मनं जिंकली.
या दिवशी मांजरांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नामांकित पशुवैद्यकीय तज्ञांनी मांजरांचा आहार, लसीकरण, लठ्ठपणा नियंत्रण आणि मानसिक आरोग्य यावर माहिती दिली. विविध नामांकित पाळीव प्राण्यांच्या खाद्य कंपन्यांनी मोफत फूड सॅम्पल्स, सप्लिमेंट्स आणि आकर्षक भेटवस्तूंचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. या निमित्ताने मांजरांना चांगले घर मिळावे, भटक्या मांजरांची काळजी घ्यावी आणि अॅडॉप्ट, डोंट शॉप या संकल्पनेचा प्रचार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अखेरीस मांजरप्रेमींनी समाधान व्यक्त करत भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणात कॅट शो आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. अनेकांनी या उपक्रमामुळे पाळीव प्राण्यांप्रती जागरूकता वाढते आणि समुदायात एकत्रितपणे पाळीव प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले.