Home Breaking News समृद्धी महामार्गावर उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यात खड्डे! मध्यंतरीच्या वृत्तानंतर MSRDC चे तातडीने...

समृद्धी महामार्गावर उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यात खड्डे! मध्यंतरीच्या वृत्तानंतर MSRDC चे तातडीने दुरुस्ती कार्य; प्रश्न राहतो गुणवत्तेचा…

37
0
मुंबई | समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते अमाणे दरम्यानचा ७६ किमीचा नव्याने सुरू झालेला मार्ग अवघ्या दोन आठवड्यांत खड्ड्यांनी पोखरला, याबाबतच्या मिड-डेच्या वृत्ताने खळबळ उडवून दिली होती. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती केली असून, अधिकाऱ्यांना नियमित देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत.
खड्ड्यांवर तातडीची मलमपट्टी –
MSRDC अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पूलाच्या भागावर असलेल्या डांबरी थरात खड्डे पडले होते. त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात आली असून, तेथे आता वाहतूक सुरळीत सुरू आहे. या ठिकाणी संरचनात्मक नाही, तर केवळ २५–३० मिमी जाडीचा डांबरी थर पावसामुळे खराब झाला होता.” ७ छोटे खड्डे मिळून सुमारे एक चौरस मीटर क्षेत्रफळात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले असून, देखभाल पथकाने त्वरित मरम्मत करून मार्ग पूर्ववत केला आहे.
फोटो शेअर करून दावा – ‘सर्व काही ठीक’
MSRDC च्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त भागाचे फोटोही प्रसारमाध्यमांना शेअर केले असून, “वाहतुकीस कोणताही अडथळा नाही,” असा दावा केला आहे. तसेच, पुढील काळात या मार्गाची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाईल, असे सांगण्यात आले.
२ आठवड्यांत ११८२ कोटींचा मार्ग खराब?
५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन झालेल्या या मार्गावर फक्त दोन आठवड्यांत खड्डे पडल्यामुळे गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हा मार्ग आरसीसी (सीमेंट काँक्रीट) असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र पूलांवरील भाग फक्त डांबराचा असून, तिथेच खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे.
पूर्वीही झाला होता फाटल्यांचा अहवाल –
ही पहिलीच वेळ नाही. एप्रिल २०२५ मध्येच अमाणे ते शहापूर दरम्यानच्या भागात काँक्रीट फाटल्याची बाब समोर आली होती. याबाबतच्या अहवालात उद्घाटनाआधीच गैरवापर, बेकायदेशीर प्रवेश आणि बांधकामात त्रुटी यावर प्रकाश टाकण्यात आला होता.
प्रश्न अनुत्तरितच –
₹११८२ कोटींचा प्रकल्प, उद्घाटनाच्या दोन आठवड्यांत खड्डे, आणि नागरिकांचे जीव धोक्यात… यात दोष कुणाचा? कामाचे दर्जा कुठे तपासले? जबाबदार कोण? राज्य सरकार, MSRDC व ठेकेदार कंपनी यांच्यातील पारदर्शकतेचा आणि उत्तरदायित्वाचा अभाव यावर समाज माध्यमांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  समृद्धी महामार्गाचा ‘वेग’ जर अपघातांचा, खड्ड्यांचा आणि गाफीलपणाचा बनत असेल, तर नागरिकांनी प्रश्न विचारणे आवश्यक आहे – विकासासाठी नाही का, तर सुरक्षिततेसाठीही?