पुणे : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार आणि पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनुभवी, दूरदृष्टी असलेले ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून सुरेश कलमाडी यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि पुढे पुणे शहराच्या विकासाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून ते ओळखले गेले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ देशपातळीवर उल्लेखनीय योगदान दिले.
पुणे शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्यात सुरेश कलमाडी यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेला ‘पुणे फेस्टिव्हल’ हा उपक्रम पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला. तसेच ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’च्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात पुणे शहराचे नाव जागतिक नकाशावर पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले.
राजकारणासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी कायम सक्रिय सहभाग ठेवला. पुणे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि राबवलेले उपक्रम नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने केवळ एक राजकीय नेता नाही, तर पुणे शहराचा एक प्रभावी आणि अनुभवी मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुरेश कलमाडी यांचे योगदान कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.