Home Breaking News पुण्याच्या ‘विज्ञानशाळा’ एनजीओला आंतरराष्ट्रीय गौरव; ‘निक्केई आशिया अवॉर्ड 2025’ने विज्ञान शिक्षण क्षेत्रात...

पुण्याच्या ‘विज्ञानशाळा’ एनजीओला आंतरराष्ट्रीय गौरव; ‘निक्केई आशिया अवॉर्ड 2025’ने विज्ञान शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास

40
0

पुणे – पुणे स्थित सामाजिक संस्था ‘विज्ञानशाळा (VigyanShaala)’ हिने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करत प्रतिष्ठित ‘निक्केई आशिया अवॉर्ड 2025’ पटकावला आहे. आशिया खंडातील समाजपरिवर्तन घडवणाऱ्या मोजक्या संस्थांमध्ये विज्ञानशाळेचा समावेश झाला असून, यापूर्वी या पुरस्काराचे मानकरी नंदन नीलेकणी, नारायण मूर्ती, किरण मजुमदार-शॉ यांसारखे दिग्गज राहिले आहेत.

विज्ञान सर्वांसाठी – एक वेगळी वाट

विज्ञानशाळेची स्थापना डॉ. दर्शन जोशी आणि डॉ. विजय वेणुगोपालन या भौतिकशास्त्रज्ञ दाम्पत्याने केली. दोघांनीही परदेशातील नामांकित विद्यापीठांतून उच्च शिक्षण घेतले. डॉ. दर्शन जोशी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज येथे पीएचडी पूर्ण केली, तर डॉ. विजय वेणुगोपालन यांनी पोलिटेक्निको दी मिलानो येथे मेरी क्युरी फेलो म्हणून डॉक्टरेट केली आणि नंतर केंब्रिज येथे व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून कार्य केले.

परंतु जागतिक संशोधन कारकीर्द सुरू ठेवण्याऐवजी, “विज्ञानातून कोण वंचित राहतो आणि का?” हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला. याच विचारातून विज्ञानशाळेची बीजे रोवली गेली.

३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच

आज विज्ञानशाळेचे कार्य देशभर पसरले असून, २८ राज्यांतील ३३० जिल्ह्यांमध्ये ३०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेने पोहोच साधली आहे. यामध्ये १४,००० हून अधिक मुली STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स) क्षेत्रात करिअर घडवत आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

तेलंगणातील वेल्फेअर संस्थांपासून ते उत्तराखंड स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (UCOST) सोबतचे सहकार्य, तसेच केरळमधील नवोन्मेषी हब-अँड-स्पोक मॉडेलपर्यंत विज्ञानशाळेचे कार्य विविध स्तरांवर सुरू आहे.

पब्लिक कॉलेज – बदलाचे केंद्र

विज्ञानशाळेची संकल्पना केवळ विज्ञान शिकवण्यापुरती मर्यादित नाही. सार्वजनिक महाविद्यालयांना ‘अंतिम टप्पा’ न मानता, ‘बदलाचे केंद्र’ म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. याच अंतर्गत ‘नॅशनल STEM चॅम्पियन्स’ हा उपक्रम राबवला जातो, ज्यात पदवीचे विद्यार्थी स्वतःचा वैज्ञानिक प्रवास घडवत असतानाच शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि विज्ञानाची गोडी गावागावात पोहोचवतात.

२०३० पर्यंत १० लाख तरुणांपर्यंत विज्ञानाचा आनंद पोहोचवण्याचे ध्येय विज्ञानशाळेने निश्चित केले आहे.

निक्केई आशिया पुरस्कार का मिळाला?

‘निक्केई आशिया अवॉर्ड’च्या निवड समितीने विज्ञानशाळेची निवड समावेशकता, समुदाय-केंद्रित नवोन्मेष आणि दीर्घकालीन क्षमताविकास या मूल्यांमुळे केली. हवामान बदल, तांत्रिक विषमता यांसारख्या आशियातील मोठ्या आव्हानांवर तोडगा केवळ सत्ताकेंद्रांतून नव्हे, तर गावांतील, डोंगराळ भागांतील आणि सार्वजनिक महाविद्यालयांतील तरुणांकडूनही निघू शकतो, हा ठाम संदेश या पुरस्कारातून देण्यात आला आहे.

विज्ञानशाळेच्या या यशामुळे भारतातील विज्ञान शिक्षण, विशेषतः ग्रामीण आणि वंचित घटकांसाठी, एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.